मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्या ३० तळीरामांवर गुन्हे दाखल करून उरण पोलिसांनी कारवाई केली. या वेळी या तळीरामांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. पोलिसांनी पहाटेपर्यंत नाकाबंदी करून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी घेतली. उरणमधील जासई नाका, करळ फाटा, चिर्ले टोलनाका तसेच उरण शहरातील बोकडविरा पोलीस नाका येथे पोलिसांनी नाकेबंदी केली होती. या वेळी उरण, न्हावा शेवा वाहतूक पोलीस तसेच पोलिसांच्या सहकार्याने ३० दुचाकी व हलक्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती उरण वाहतूक पोलीस विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर जगताप यांनी दिली. या वेळी वाहनांची तपासणी करून चालकाने मद्यप्राशन केले आहे का, वाहनांचा वेग किती आहे, याचीही तपासणी करीत सुरक्षा राखण्याचा प्रयत्न केला. या दोषी चालकांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला, तर दंड न भरणाऱ्या चालकांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.