नवरात्रोत्सव मंडपातील बंदोबस्तात मोठी वाढ

उरणमध्ये दहशतवादी घुसल्याच्या वार्तेनंतर निर्माण झालेल्या गोंधळाच्या पाश्र्वभूमीवर नवी मुंबईत नवरात्रोत्सवात खबरदारीचा उपाय म्हणून कडकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहेत.

शहरातील ३०३ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांच्या सुरक्षेसाठी नवी मुंबई पोलीस सर्व आघाडय़ांवर सज्ज झाले आहेत. यासाठी सुरक्षा नियमावली तयार करण्यात आली आहे.

सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडपाच्या आवारात वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे. शनिवारपासून नवरात्रोत्सवाला आरंभ होत आहे. त्यामुळे नऊ दिवस शहरात ठीकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यासाठी नवरात्रोत्सव मंडळाच्या बैठका पोलिसांनी घेतल्या.या वेळी विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. नवी मुंबईतील ५२ ठिकाणी पोलीस संख्येत वाढ करण्यात आली आहे. उरण भागांत संशयित दहशतवादी घुसल्याच्या पाश्र्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून मंडळांच्या कार्यकर्त्यांना सुरक्षेसंदर्भातील काही सूचना केल्या आहेत.

नवरात्रोत्सवाच्या काळात शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडत असल्यास त्याची माहिती तातडीने पोलिसांना कळवावी. कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये.

प्रशांत खरे, पोलीस उपायुक्त, नवी मुंबई परिमंडळ १

 

* दहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दहा विशेष तुकडय़ा असतील.

*  प्रत्येक मंडळांना सीसीटीव्ही कॅमेरे लावणे बंधनकारक

*  मंडप आवारात ‘नो पार्किंग झोन

*  कार्यकर्त्यांना ओळखपत्र दाखवणे बंधनकारक असेल.

*  महिलांच्या सुरक्षेसाठी साध्या वेशात महिला पोलीस तैनात

*  याशिवाय संशयित व्यक्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस मित्रांची मदत

*  आपत्कालीन यंत्रणाही सज्ज

*  लॉजिंग आणि हॉटेलची कसून तपासणी