मोर्चे काढून आरोप-प्रत्यारोप; तळोजाकरांच्या घशाची कोरड मात्र कायम?

पनवेलकरांच्या घशाला डिसेंबरमध्येच कोरड पडण्यास सुरुवात झाली असून पाणीप्रश्न पेटला आहे. तळोजा परिसरात याची मोठी झळ बसत असल्याने सिडकोवर मोर्चा काढण्याचे ठरविण्यात आले, पण हा मोर्चा राजकीय पक्षांनीच हायजॅक केला. ऐन वेळी गुरुवारी भाजपने सिडकोवर धडक दिली तर शुक्रवारी महाआघाडीसह समाजवादी पक्षाने मोर्चा काढला. त्यामुळे पाणीप्रश्नाचे केवळ राजकीय भांडवल केले जाणार असून तळोजाकरांच्या घशाची कोरड मात्र कायम राहणार की काय, असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे.

भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी एक दिवसआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पनवेल पालिका प्रशासनाने घेतला आहे. पालिका क्षेत्राला सध्या २४० दशलक्ष लिटर पाण्याची गरज असताना त्यात १०० दशलक्ष लिटर पाणी तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे तळोजासारख्या नवीन उपनगरातील रहिवाशांना पाण्यासाठी रातभर जागण्याची वेळ आत्ताच आली आहे. या उपनगराला आठ दशलक्ष पाण्याची आवश्यकता असताना केवळ अडीच ते तीन दशलक्ष लिटर पाणी मिळत आहे. त्यामुळे तळोजावासीय संताप व्यक्त करीत आहेत. यासाठी सिडकोवर धडक देण्याचा निर्णय रहिवाशांनी घेतला होता. मात्र ऐन वेळी राजकीय पक्षांनी यात शिरकाव केला.

तळोजा फेजमध्ये पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, म्हणून गुरुवारी ऐन वेळी भाजपाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यात शनिवारपासून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन सिडकोकडून देण्यात आले. फेज १ व २ मधील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी जलदगतीने बुस्टर पंप बसवून त्या संदर्भातील सर्व तांत्रिक अडचणी दूर करण्यात येतील, असे सांगण्यात आले.

त्यानंतर शुक्रवारी शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, (महाआघाडी), समाजवादी पक्ष आणि समाजसेवी सामाजिक संस्था यांच्या वतीने हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. पाणी द्या, नाही तर खुच्र्या खाली करा, केंद्रात सत्ता, सिडकोत सत्ता, पालिकेत सत्ता तरीही पाण्यासाठी वंचित पनवेलकर जनता, अशा घोषणा देत स्व. दि. बा. पाटील चौक (पाचनंद हाइट, सेक्टर-९, फेस-१) येथून हा मोर्चा निघाला.

भाजप व महाआघाडी यांना पाणीप्रश्नांशी काहीही घेणं-देणं नसून फक्त राजकारण करण्यात येत असल्याचा भावना जनसामन्यातून व्यक्त होत आहेत. दोन्ही मोर्चात कोणत्याही सर्वसामान्य नागरिकांचा समावेश नव्हता, असे तळोजा येथील रहिवासी धर्मनाथ गोंधळी यांनी सांगितले.

सर्वसामान्य माणसाला न्याय या मोर्चातून मिळणार नाही. फक्त स्वत:ची राजकीय पोळी भाजण्याचा उद्देश आहे.

-गोविंदा जोशी, तळोजा रहिवासी