आरटीओच्या नेरुळ येथील केंद्रावरून राजकीय वाद

सिडकोने आरटीओला नेरुळ सेक्टर १९ ए येथील भूखंड दिला आहे. या भूखंडावर वाहन तपासणीसाठी ब्रेक टेस्टिंग ट्रॅक तयार करण्यात येत आहे. या ट्रॅकचे काम सुरू असल्यामुळे १५ मार्चपर्यंत रस्त्यावरच वाहन तपासणी करण्याची परवानगी न्यायालयाने आरटीओला दिली आहे. येथे आरटीओचे वाहन तपासणी केंद्र उभारण्यास स्थानिकांचा विरोध आहे. त्यावरून राजकीय वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

१ फेब्रुवारीपासून २८ फेब्रुवारीपर्यंत वाहन तपासणीचे शहरातील केंद्र बंद करण्यात आल्याने वाहन तपासणीसाठी पेण येथे जावे लागत होते. अनेक वर्षांपासून भिजत पडलेला आरटीओच्या वाहन तपासणी केंद्राच्या जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी सिडकोने सेक्टर १३ व सेक्टर १९ ए मध्ये भूखंड दिले आहेत. परिसरातील नागरी वस्ती, शाळा, महाविद्यालय, वंडर्स पार्क असल्याने येथे तपासणी केंद्र सुरू झाल्यास जड, अवजड वाहनांचा स्थानिकांना त्रास होईल, असे कारण देऊन या केंद्राला सुरुवातीपासूनच विरोध करण्यात येत होता. स्थानिक आमदार मंदा म्हात्रे, आमदार संदीप नाईक, सभागृह नेते स्थानिक नगरसेवक रवींद्र इथापे यांचा या केंद्राला विरोध आहे. सिडकोने आरटीओला अन्यत्र भूखंड द्यावा, अशी मागणी भाजप व राष्ट्रवादीने आयुक्त व सिडको संचालकांकडे केली होती. सिडकोने आरटीओला येथे भूखंड दिले. परंतु न्यायालयाने आरटीओला रस्त्यावरच वाहन तापसणी करण्यासाठी १५ मार्चपर्यंतच परवानगी दिल्याने सध्या घणसोलीतील बस डेपोजवळच्या  रस्त्यावरच तात्पुरती वाहन तपासणी सुरू करण्यात आली आहे.

न्यायालयाने या भूखंडावर काम करण्यास अनुमती दिली आहे. न्यायालयाच्या परवानगीने तात्पुरते वाहन तपासणी केंद्र सुरू आहे. त्याची परवानगी १५ मार्चला संपत आहे. पुन्हा वाहन तपासणीचा प्रश्न निर्माण होणार असल्याने योग्य तो निर्णय घेण्यात येईल.   – संजय डोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

नेरुळ सेक्टर-१९मध्ये आरटीओ ब्रेक टेस्टिंग केंद्राला भूखंड देण्यास विरोध केला आहे. रवींद्र इथापे नागरिकांची दिशाभूल करीत आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा. आरटीओचे अधिकारी एमआरटीपी कायद्याचे उल्लंघन करीत आहेत. उद्घाटनाला काळ्या फिती लावून विरोध करण्यात येणार आहे.  – विजय घाटे, महामंत्री, भाजप

आरटीओला दुसरा भूखंड द्यावा, अशी मागणी सिडको, पालिका, न्यायालयाकडे केली आहे. पालिकेने प्रतिज्ञापत्र सादर करावे, अशी मागणी आहे. भाजप माझ्या राजीनाम्याची मागणी करीत असेल तर आमदार म्हात्रे यांनीही येथील भूखंड बदलून देण्याची मागणी केल्यामुळे भाजपच्या आमदारांचाच राजीनामा घ्यावा.         – रवींद्र इथापे,सभागृह नेता,नमुंमपा