News Flash

ग्रामपंचायतीत ‘जोर’ काढूनही महानगरपालिकेसाठीही ‘बैठका’

१२ ग्रामपंचायतींतील नव्या लोकसंख्येनुसार एक लाख ३५ हजार ५०५ लोकसंख्या महसूल विभागाकडे प्राप्त झाली आहे.

पनवेल तालुक्यातील निवडणुकांत राजकीय मल्लांचा कस लागणार ; राजकीय नेत्यांचा शक्तीप्रदर्शनावर भर
पनवेल महानगरपालिका होणार की ग्रामपंचायतीमार्फतच येथील रहिवाशांचा विकास केला जाणार आहे, याविषयी सध्या अनेक तर्कवितर्काना उधाण आले आहे. तालुक्याच्या राजकीय वर्तुळातील नेते मंडळींना विशेष करून याची चिंता सतावत आहे. तीन दिवसांपूर्वी सुरू झालेल्या १२ ग्रामपंचायतींत नव्याने प्रभाग रचना पडली. त्यामुळे येथील राजकीय गणित बदलली आहेत. ग्रामपंचायत निवडणुका लढवल्यानंतर जर दोन महिन्यांत महानगरपालिका जाहीर झाल्यास पुन्हा निवडणुकांचे आव्हान पेलावे लागणार असल्याने अनेकांनी आगामी रणनीती काय असेल, याविषयी पक्षपातळीवर खल सुरू केला आहे.
महसूल विभागातील बडे अधिकारी अद्याप तरी पनवेल महानगरपालिका निर्मितीच्या घोषणेविषयी अनभिज्ञ आहेत. त्यामुळे राजकीय नेत्यांना पुढचा अंदाज बांधणे कठीण होऊन बसले आहे.
पनवेलमधील १२ ग्रामपंचायतींतील नव्या लोकसंख्येनुसार एक लाख ३५ हजार ५०५ लोकसंख्या महसूल विभागाकडे प्राप्त झाली आहे. या लोकसंख्येपैकी ६७ हजार २३५ हा आकडा कळंबोली ग्रामपंचायतीतील लोकसंख्येचा आहे. यावेळी रोडपाली नोड आणि कळंबोली वसाहतीतील शहरी मतदारांना ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये सहभागी होता येणार आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षांतील नेत्यांनी शक्तीप्रदर्शनावर भर देण्याचे ठरवले आहे. तशा हालचाली सुरू झाल्या आहेत. शहरात जागोजागी मेळावे, आंदोलने राजकीय पुढाऱ्यांच्या नेतृत्वाखाली हाती घेतली जात आहेत. ग्रामपंचायतीत निवडणुका लढवून सदस्यपदावर उमेदवार निवडून आणायचे आणि पुन्हा काही महिन्यातच पालिका जाहीर झाल्यावर याच प्रभागांत नगरसेवकपदासाठी उमेदवारी निवडून आणायची या दुहेरी आव्हानामुळे राजकीय वर्तुळातील पुढाऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
वसाहतींमधील इतर रहिवाशी आणि स्थानिक यांच्यात या निवडणुकांमुळे दोन गट पाहायला मिळतील. कामोठे आणि खारघर या वसाहतींत काही वर्षांपूर्वी वसाहतींमधील रहिवाशी विरुद्ध स्थानिक या लढय़ाची पुनरावृत्ती ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे. रोडपाली रेसीडेन्ट वेल्फेअर असोशिएशन, कळंबोली फोरम आणि काही सामाजिक संघटना आपली ताकत आजमावण्यासाठी या निवडणुकांमध्ये उतरण्याची शक्यता आहे. मेअखेरीस ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगूल वाजण्याची शक्यता आहे.

१२ ग्रामपंचायतींची लोकसंख्या
* पालेखुर्द ७९६३ *  आसूडगाव – ८८५८ *  टेंभोडे – २२५० *  पडघे – ४६५६ *  वळवली – २७५७ *  नावडे – ६४४७ *  पेणधर – ९४८८ *  कळंबोली – ६७२३५ *  घोट – ३९०० *  तोंडरे – ६२२२ *  रोडपाली – १२१६० *  खिडुकपाडा –  ३५६९

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2016 12:59 am

Web Title: political leaders believed in power exhibition for elections in panvel taluka
Next Stories
1 नवी मुंबईत इंटरनेट पुरवठादारांमध्ये स्वस्त सेवेसाठी चढाओढ
2 शिक्षण हक्कअंतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के आरक्षण
3 बांधकामासाठी तलावातील पाणी
Just Now!
X