शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप नेत्यांची परस्परांवर चिखलफेक

आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून नवी मुंबईतील राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी आत्तापासूनच झडू लागल्या आहेत. राजकीय नेत्यांनी एकमेकांच्या नावाने शिमगा सुरू केला आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची पक्षनेतेपदी बढती मिळाल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या त्यांच्या सत्कार समारंभापासून या शिमग्याला सुरुवात झाली. गेल्या आठवडय़ात भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनीही माजी पालकमंत्री व शिवसेनेचे उपनेते यांच्या आरोपांना उत्तर देऊन वादात उडी घेतली आहे.

ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्षाच्या वतीने नुकताच सीवूड्स येथे सत्कार करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना शिंदे यांनी ‘पुढच्या वेळी पालिकेवर भगवा फडकविल्याशिवाय राहणार नाही,’ असा निर्धार व्यक्त केला. शिवसेनेचे उपनेते व माजी पालिका आयुक्त विजय नाहटा यांनी ‘महापौर निवडणुकीत भाजपाने शेपूट घातले,’ अशी भाषा वापरली. हे वक्तव्य भाजपा कार्यकर्त्यांच्या विशेषत: आमदार म्हात्रे यांच्या चांगलेच जिव्हारी लागले. आमदार म्हात्रे व नाहटा यांचे वैर शहरात सर्वज्ञात आहे. शिंदे यांच्या भगवा फडकवूच या निर्धाराला माजी मंत्री गणेश नाईक यांनी नेरुळ येथील एका हळदीकूंक कार्यक्रमात उत्तर दिले. ‘भगवा घेऊन याच तो घेऊन परत पाठविला नाही तर नावाचा नाईक नाही,’ असे आव्हान नाईक यांनी दिले. त्यामुळे भगव्याचा अपमान झाला, अशी आवईदेखील शिवसेनेच्या काही नेत्यांनी उठवली.

मागील आठवडय़ात भाजपाने वाशी येथील भावे नाटय़गृहात कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. रायगडचे पालकमत्री रवींद्र चव्हाण या मेळाव्याचे प्रमुख अतिथी होते, पण नाईक आणि नाहटा यांना उत्तर देणारे म्हात्रे यांचे भाषण चर्चेचा विषय ठरले.

‘एकेकाळी सनदी अधिकारी असलेले नाहटा यांची भाषा किती घाणेरडी आहे. निवडणुका जवळ आल्याने दोन नागोबा बिळाबाहेर पडले आहेत,’ अशी टीका म्हात्रे यांनी नाईक आणि नाहटा यांचे नाव न घेता केली. म्हात्रे यांच्या या टीकेला आता हे दोन नेते काय उत्तर देतात, याची उत्सुकता सध्या नवी मुंबईकरांना आहे. त्यामुळे पुढील महिन्यात येणाऱ्या शिमग्या (होळी) आधीच नवी मुंबईत राजकीय शिमगा रंगू लागल्याची चर्चा आहे.