नवी मुंबई पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात प्रकल्पग्रस्तांना हाताशी धरून मुंबई बंदची हाक दिल्यानंतर आता राजकीय पक्षांनी आयुक्तांविरोधात दलित अस्मितेचा वापर केल्याचे पालिका सभागृहात मंगळवारी झालेल्या सभेत स्पष्ट झाले. ऐरोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या घुमटाला संगमरवरी आच्छादन करण्याच्या मुद्दय़ावर राजकीय पक्षांनी मुंढे यांना माघार घेण्यास भाग पाडले. याप्रकरणी शिवसेना नगरसेवकांनी मौन पाळले होते.
मागील महिन्यात तुर्भे गावात सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांवर पालिकेने हातोडा चालविण्याची तयारी सुरू केली होती. त्याला प्रकल्पग्रस्तांनी जोरदार विरोध करीत बंदची हाक दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामांवर कारवाईस पावसाळ्यापर्यंत स्थगिती दिली. मुंढे राजकीय पक्षांना विश्वासात न घेता निर्णय घेत असल्याचा त्यांच्यावर आरोप होत आहे. ऐरोली येथे पालिका १८० कोटी रुपये खर्चून उभारलेले डॉ. आंबेडकर स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्याच वेळी स्मारकाच्या घुमटांना संगमरवरी
आच्छादनासाठी १९ कोटी रुपये खर्चाचे काम आयुक्तांनी रद्द केले. त्याऐवजी या जागेवर रंग मारण्यात येणार असून पांढऱ्या रंगाच्या संगमरवरी हा घुमट काळवंडणार असल्याचा आयआयटीचा हवाला देऊन हे काम रद्द केल्याचे आयुक्तांनी प्रसिद्धीमाध्यमांना सांगितले. सर्वसाधारण सभेने मंजूर केलेला प्रस्ताव नामंजूर करण्याअगोदर सभेला विचारण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे. घुमट संगमरवरी होता की पांढरा रंग होता याची माहिती आयुक्तांनी प्रस्ताव रद्द केल्याची रीतसर प्रसिद्धिपत्रक काढून करून दिली. त्यामुळे आता आंबेडकरी चळवळीच्या समर्थकांनी घुमटाचा आग्रह धरला आहे.