अनधिकृत धार्मिक स्थळांना कायद्याची कवचकुंडले मिळावीत, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, सिडको व पनवेल नगर परिषदेच्या प्रशासनामध्ये लगबग सुरू आहे. पनवेल शहरामध्ये २२, तर सिडकोच्या पाच वसाहतींमध्ये १५१ अनधिकृत धार्मिक स्थळे आहेत.
अनधिकृत धार्मिक स्थळे उभारलेल्या संबंधित व्यक्ती, संस्थांना नोटिसा बजावणे आणि त्याला आलेले उत्तर फाइलला लावणे एवढेच काम प्रशासनाकडून होत आहे. सिडको व नगर परिषदेने कोणतीही ठोस भूमिका न घेतल्यामुळे व संरक्षण मागतील त्यावेळी पाहू, अशी बघ्याची भूमिका पोलिसांनी घेतल्याने या अनधिकृत स्थळांमध्ये वाढ झाली आहे.
पनवेल नगर परिषदेच्या गेल्या महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांना नियमित करणे व काही स्थळे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. नगर परिषदेच्या सदस्यांनी तसा ठराव केला.
या ठरावानुसार एसटी स्टॅण्ड व रेल्वे स्थानकामधील रस्त्यालगत असणारे नवनाथ मंदिर, उद्यानाच्या जागेतील इच्छापूर्ती गणेशमंदिर, राष्ट्रीय महामार्ग ४ च्या पॅनेसिया रुग्णालयासमोरील कानिफनाथ मंदिर, इस्रायल तलावाच्या काठावरील नगर परिषदेच्या जागेवरील मशीद आणि इस्रायल तलावाशेजारील नवनाथ मंदिर हे नियमित करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. ही धार्मिक स्थळे वर्षांनुवर्षे असल्याने त्यावर हातोडा चालवू नका, अशी सूचना नगरसेवकांनी मांडली होती. इंदिरानगर झोपडपट्टीमधील कर्नाटक मंदिर, शासकीय गोदामाजवळील रस्त्यामधील साई मंदिर, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४च्या जागेतील नवनाथ मंदिर, जुन्या टपाल कार्यालयाजवळील म्हसोबा देवस्थान, लाइन आळी येथील मुंजोबा देवस्थान, मिरची गल्ली येथील म्हसोबा देवस्थान, महावितरण कार्यालय उरण नाका येथील दत्त मंदिर आदींच्या ट्रस्टना कागदपत्रे सादर करण्यासाठी नगर परिषदेने नोटिसा दिल्या आहेत.
कागदपत्रांची छाननी करून ही मंदिरे कायद्याच्या चौकटीत बसल्यास त्यांना स्थलांतरणासाठी जागा मिळणार आहे. सिडको वसाहतीमध्ये खारघरमध्ये १५ धार्मिक स्थळे अनधिकृत आहेत, तर कामोठे वसाहतीमध्ये अशी चार धार्मिक स्थळे असल्याची माहिती सिडकोच्या दफ्तरी नोंदवली गेली आहे. कळंबोलीमध्ये ३२, तळोजा वसाहतीमध्ये आठ आणि उलवे नोडमध्ये ४३ तसेच नवीन पनवेल नोडमध्ये ४९ धार्मिक स्थळे आहेत.

वाढता वाढता वाढे
कळंबोलीमधील साईनगर येथे सिडकोने उदंचन केंद्र बांधू नये म्हणून एक धार्मिक स्थळ रातोरात उभारले. आज या मंदिरासोबत पुजाऱ्यासाठी राहण्याची व्यवस्था केली आहे. येथून जवळच एक मुतारीही बांधली आहे. या रहिवाशांना रोज दरुगधीचा त्रास सहन करावा लागतो. मंदिरातील उच्चरवातील आरतीही त्रासदायक असते. येथे उदंचन केंद्र न बांधल्याने पावसाळ्यात पाण्याचा निचरा न होऊन मलनिस्सारण वाहिन्या तुंबण्याचे प्रकार घडतात.

मुख्यमंत्र्यांच्या दर्शनाचा आधार
कामोठे वसाहतीमध्ये मोठय़ा प्रमाणात अनधिकृत धार्मिक स्थळे आहेत. एका बडय़ा नेत्याच्या सांगण्यावरून या वसाहतीमध्ये एक धार्मिक स्थळ बांधण्यात आले. सिडकोने त्यावर दोनदा कारवाई केली. मात्र या धुरंदर नेत्याने एका राजकीय कार्यक्रमात राज्याच्या मुख्यमंत्र्यांना येथे आमंत्रित करून या स्थळाचे दर्शन घडवले. यानंतर या स्थळाला लागलीच सरकारी कवचकुंडल मिळाले. सिडकोने जाहीर केलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळांच्या यादीत या धर्मस्थळाचा उल्लेख नाही.