‘वातावरण’ संस्थेकडून दहा स्मरणपत्रे; पर्यावरण विभागाकडून पोचही नाही

नवी मुंबई :  खारघर, तळोजा, पनवेल, कामोठे या क्षेत्रांतील तळोजा एमआयडीसीतील शेकडो रासायनिक कारखान्यांमुळे निर्माण होणारे घातक हवा प्रदूषण, शीव-पनवेल महामार्गावरील लाखो वाहनांचा धूर आणि अनियंत्रित बांधकामांमुळे उडणारा धुरळा यामुळे या भागातील हवा अत्यंत प्रदूषित झाली आहे. त्याबाबत अनेक सामाजिक संस्था व नागरिकांनी आवाज उठवूनही पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना या गंभीर समस्येकडे लक्ष देण्यास वेळ नाही. वातावरण या पर्यावरणविषयक संस्थेने ठाकरे यांना आतापर्यंत दहा स्मरणपत्रे दिलेली आहेत, पण त्याची साधी पोच देण्याचे सौजन्य या पर्यावरण विभागाने दाखवलेले नाही. त्यामुळे येथील नागरिक संतप्त झाले आहेत.

नवी मुंबई शहर निर्मितीसाठी करण्यात आलेले कोट्यवधी चौरस फूट बांधकामासाठी याच ठिकाणी परसिक डोंगराला पोखरून बांधकाम साहित्य तयार करण्यात आले. तेव्हापासून नवी मुबंईच्या प्रदूषणात अधिक भर पडली. त्यापूर्वी मुंबईतील सर्व रासायनिक कारखाने नवी मुंबईत हलविण्यात आल्याने प्रदूषणकारी शहर म्हणूनच नवी मुबंईची ओळख निर्माण झाली होती. पर्यावरण जागृती वाढल्याने येथील दगडखाणींचे नूतनीकरण थांबवण्यात आले असून आता बोटावर मोजण्याइतक्या दगडखाणी सुरू आहेत तर नवी मुंबई एमआयडीसी क्षेत्रातील रासायनिक कारखान्यांनी येथील भूखंड विकून स्थलांतर केले आहे. त्यामुळे उत्तर नवी मुंबईतील प्रदूषण काही प्रमाणात कमी झालेले असतानाच दक्षिण नवी मुंबईतील प्रदूषणात मात्र कमालीची वाढ होऊ लागली आहे. तळोजा एमआयडीसीतील शंभरपेक्षा जास्त रासायनिक कारखाने रात्रीच्या वेळेस सर्रासपणे प्रदूषण करीत असल्याचे दिसून आले आहे. कासाडी नदीला प्रदूषित केल्याने या एमआयडीसीला यापूर्वीच हरित लवादाने दंड ठोठवला आहे. पाणी प्रदूषणानंतर आता तळोजा एमआयडीसी हवा प्रदूषणात आघाडीवर आहे. त्यामुळे तळोजा, नावडे, खारघर, कळंबोली, पनवेल, कामोठे या दक्षिण नवी मुबंईतील उपनगरात संध्याकाळ झाली की दरवाजे खिडक्या बंद करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना या प्रदूषणाचा जास्त त्रास होऊ लागला आहे. सिडकोने वसविलेल्या या उपनगरात सिमेंटचे जंगल मोठ्या प्रमाणात असून वृक्षसंपदा अगदीच नगण्य आहे. त्यात पारसिक डोंगररांग (पांडवकडा) जवळ असल्याने हवा अधिक वर जात नसल्याने हिवाळ्यात हे प्रदूषण जास्त जाणवत आहे. अनेक डॉक्टर तसेच सामाजिक संस्थांनी या वाढत्या प्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. वातावरण या संस्थेने याबाबतचा एक अहवाल दोन महिन्यांपूर्वी सादर करून या उपनगरात पीएम २.५ हा प्रदूषणकारी घटक या भागात जास्त असल्याने सकाळची सहा ते आठ हे वेळ नागरिकांसाठी बाहेर पडण्यास धोकादायक असल्याचे त्यात म्हटले आहे, पण या अहवालाला स्थानिक पातळीवर केराची टोपली दाखविण्यात आली आहे. मुंबई आणि दिल्लीत प्रदूषणाचे परिणाम पटवून देण्यासाठी ‘बिल बोर्ड’ नावाची संकल्पना काही सामाजिक संस्थांनी रुजवली होती. त्यामुळे मुंबईत वांद्रे येथे बिल बोर्डवर लावण्यात आलेली कृत्रिम फुप्फुसे ही पंधरा दिवसांत काळी ठिक्कर पडली तर दिल्लीत प्रदूषण  सवाधिक असल्याने सहा दिवसांत या फुप्फुसांचा रंग बदललेला दिसून आला, मात्र राज्यात सर्वाधिक प्रदूषण असल्याचे ठिकाण ही नवी मुंबईतील दक्षिण भाग  असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या भागात केवळ दहा दिवसांत फुप्फुसे काळी पडली आहेत. मुंबईत हे प्रमाण पंधरा दिवसांचे आहे. त्यामुळे मुंबईपेक्षा नवी मुंबई प्रदूषणात आघाडीवर आहे. भावी पिढी या प्रदूषणामुळे आजारी पडत आहे. लहान मुलांना श्वासनाचे त्रास वाढले आहेत तर ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी राहणे मुश्कील झाले आहे. वातावरण आणि इतर काही सामाजिक संस्थांनी आरे कॉलनीला वाचविण्यासाठी पुढाकार घेणारे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना प्रत्यक्ष तसेच मेलद्वारे या प्रदूषणकारी शहराची हकिगत सांगितली, मात्र हे शहर राज्यात नाही या आविर्भावात या पत्रांची साधी दखलदेखील घेण्यात आलेली नाही. त्यामुळे आता येथील जनता जागरूक होत असून प्रदूषणाच्या विरोधात आंदोलन उभारण्याची तयारी सुरू झाली आहे.

कर्करोग रुग्णांना धोका

देशात कर्करोगावर प्रभावी उपचार करणाऱ्या टाटा रुग्णालयाची एक शाखा याच खारघर भागात आहे. शेकडो रुग्ण या ठिकाणी उपचार घेत असून त्यांनाही या प्रदूषणाचा त्रास होऊ लागला असल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले. पाच वर्षांपूर्वी राज्यात सर्वाधिक प्रदूषणयुक्त शहर म्हणून याच भागाचा नागपूर अधिवेशनात उल्लेख करण्यात आला होता. तळोजा एमआयडीसी, महामार्ग, बांधकामे याचबरोबर नवी मुंबई विमानतळासाठी उलवा टेकडीची उंची कमी करण्याच्या कामाता करोडो मेट्रिक टन मातीचा भराव करताना या प्रदूषणात भर पडली असल्याचे दिसून येते.