वाहतूक कोंडी आणि थंडी यामुळे नवी मुंबईतील प्रदूषणात वाढ 

नवी मुंबईच्या मध्यवर्ती भागातून जाणारे मुंबई-पुणे व मुंबई-गोवा महामार्ग आणि जेएनपीटी मार्गावरील कंटेनरची वाहतूक यामुळे या शहरात इतर शहरांच्या तुलनेत प्रदूषणाचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले आहे. खाडीकिनारा आणि डोंगररांगांच्या मधोमध असलेल्या ठाणे-बेलापूर मार्गावर सकाळ-संध्याकाळी होणारी वाहतूककोंडी आणि गेले दोन दिवस वाढलेली थंडी यामुळे वाहनांचा धूर आणि धूलिकण एकाच जागी राहत आहेत. त्यामुळे वातावरणात धुरक्याचा एक थर दिसू लागला आहे.

शहराला लगतच्या डोंगररांगामुळे धूलिकणांना वातावरणात मिसळण्यास वाव मिळत नाही. नवी मुंबईतून ठाणे-बेलापूर हा प्रचंड रहदारीचा मार्ग जातो. गेल्या काही वर्षांत या मार्गावरील वाहतूक पाच पटींनी वाढली आहे. या मार्गावर घणसोली, रबाळे, तुर्भे व ऐरोलीत वाहतूक कोंडी होते. इंजिन सुरू ठेवून बराच काळ एका जागी उभ्या राहणाऱ्या या वाहनांमुळे धूर आणि धुळीचे कण वाऱ्यासह सर्वत्र पसरतात, मात्र सध्या हवेत गारवा असल्याने हे धूलिकण हवेत वरच्या दिशेने न जाता खालीच राहात आहेत. सूर्योदयानंतर हा थर कमी होत असल्याचे पर्यावरणतज्ज्ञांनी सांगितले. यात पीएम-१० धूलिकणांचे प्रमाण ३४० मायक्रोग्रॅम क्युबिक प्रति मीटर आहे. पीएम-२५ प्रकारातील धूलिकण तर ३९० मायक्रोमीटर आकाराचे आहेत. पालिकेने ऐरोली, कोपरखैरणे, तुर्भे आणि वाशी येथे लावलेल्या प्रदूषण चाचणी फलकावर जादा प्रदूषण पातळी आढळून आली असून हे प्रमाण घणसोली, रबाळे, ऐरोली आणि तुर्भे या भागात जास्त असल्याचे स्पष्ट दिसते. तुर्भे भागात काही दगडखाणींचा खडखडाट आजही सुरू आहे. तिथे प्रदूषणाची पातळी सर्वाधिक आहे. एअर क्वालिटी, फोरकास्टिंग अ‍ॅण्ड र्सिच यांच्या सर्वेक्षणातही प्रदूषण वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

थंडीच्या काळात शहरी भागात प्रदूषणाची पातळी वाढते. नवी मुंबईत हे प्रमाण जास्त आहे. त्याला शहराची भौगोलिक रचनादेखील कारणीभूत आहे. वाढत्या प्रदूषणामुळे नवी मुंबईकर त्रासले आहेत.  या संधीचा फायदा घेऊन काही कारखाने घातक वायू हवेत सोडत असल्याचेही आढळले आहे. पालिका या धुरक्याची तपासणी करत आहे.

– मोहन डगावकर, शहर अभियंता, नवी मुंबई पालिका

प्रदूषणाचे प्रमाण

* धूलिकण    १४७

* सूक्ष्म धूलिकण     ६१

* नायट्रोजन ऑक्साइड        ४४

* कार्बन मोनॉक्साइड २.७८

* मिथेन     ९.२७

* हवेचा वेग   ०.४०