नागरिकांकडून आरोग्याच्या तक्रारी

नवी मुंबई : पारसिक डोंगराची रांग, दोन राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक, नवी मुंबई विमानतळाचे सपाटीकरणाचे काम, दक्षिण नवी मुंबईत सुरू असलेली बांधकामे, काही रासायनिक कारखान्यांमुळे मुंबई, ठाणे, कल्याण या शेजारच्या शहरांपेक्षा नवी मुंबईतील प्रदूषणाची पातळी मंगळवारी वाढली असल्याचे आढळून आले आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळ ही वाढलेली पातळी मान्य करण्यास तयार नसले तरी वातावरणात वाढलेल्या गारव्याचा आनंद घेण्यास बाहेर पडलेल्या नागरिकांना हे हवेतील प्रदूषण सहन करावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

नवी मुंबईच्या आजूबाजूच्या इतर शहरांपेक्षा सायबर सिटीतील प्रदूषणाची पातळी नेहमीच वरचढ राहिलेली आहे. त्याला नवी मुंबईची भौगोलिक रचना कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पारसिक डोंगर रांग आणि ठाणे खाडीच्या मधील शंभर किलोमीटर अंतरावर वसलेल्या या शहरातील प्रदूषित हवा थंडीच्या काळात अडून राहात असल्याने या शहरातील प्रदूषण जास्त आहे.

मंगळवारी नोंदविण्यात आलेल्या  प्रदूषण पातळीची गुणवत्ता  मुंबईची १५५पीपीएम तर ठाण्याची सर्वात कमी म्हणजे ७८पीपीएम इतकी आहे. कल्याणची गुणवत्ता १४२पीपीएम असून नवी मुंबई या तीन शहरांपेक्षा जास्त १५७पीपीएम आहे. नवी मुंबईतील पारसिक डोंगरात असणाऱ्या दगडखाणी याअगोदर प्रदूषण वाढविण्यास कारणीभूत ठरणाऱ्या होत्या. मात्र आता त्यांची संख्या कमी झाली आहे. या प्रदूषणाची जागा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कामासाठी होणारे ब्लास्टिंग आणि त्यामुळे हवेतील धुळीकणाची वाढणारी संख्या यामुळे हे प्रदूषण वाढल्याचे सांगितले जाते. याच वेळी नवी मुंबईतून शीव-पनवेल महामार्ग व ठाणे-बेलापूर मार्गावरून जाणाऱ्या वाहनांची संख्या दुप्पट झाल्याने या प्रदूषणात भर पडली आहे. नवी मुंबई पालिकेने या प्रदूषणावर मात करणाऱ्यासाठी एक आराखडा तयार केला आहे पण त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. पालिकेने शहराच्या मुख्य उपनगरात हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी गुणवत्ता फलक लावले होते पण त्यातील अधिक फलक सध्या बंद पडलेले आहेत.

राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने दोन वर्षांपूर्वी नवी मुंबईतील प्रदूषण पातळी जास्त असल्याचे जाहीर केले होते. त्यावेळी त्यांना तळोजा एमआयडीसीतील प्रदूषण पातळीवर आक्षेप अभिप्रेत आहे. नागरी विकास मंत्रालयाने काही महिन्यांपूर्वी केलेल्या पाहणीत नवी मुंबई हे राहण्यास देशात दुसऱ्या क्रमांकाचे शहर असल्याचे जाहीर केले होते. मात्र येथील प्रदूषणाची वाढणारी पातळी पाहता हे शहर आता नागरिकांना राहण्यास योग्य वाटत नसल्याचे दिसून येते.

नवी मुंबईच्या पूर्व बाजूस डोंगर, पश्चिम बाजूस समुद्र आणि शीव-पनवेल महामार्ग, दक्षिण बाजूस सुरू असलेले नवी मुंबई विमानतळाचे भराव काम तर उत्तर बाजूस असलेल्या ठाणे-बेलापूर मार्गावरील वाढती वाहतूक या सर्व प्रदूषित घटकांमुळे नवी मुंबईतील प्रदूषणाची पातळी इतर शहरांपेक्षा जास्त असून ती कायम राहणार आहे.

-मोहन डगांवकर, पर्यावरणतज्ज्ञ, नवी मुंबई