पावसाळा तोंडावर आल्यावर शहरभरातील तळ्यांमधील गाळ काढण्याचे काम हाती घेतलेल्या पनवेल नगर परिषदेचा भोंगळ कारभार वडाळा तलावाच्या कामादरम्यान जागरूक नागरिकाने उजेडात आणला आहे. गेल्या २० दिवसांपासून वडाळे तळ्यामधील गाळ काढण्याचे काम संथगतीने सुरू असून हा गाळ तळ्याच्या काठावर ठेवून तो उचलला जात नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे पावसाच्या सरी कधीही बरसू शकतात अशी परिस्थिती असताना हा गाळ तळ्यातच पुन्हा जाईल या पद्धतीने ठेवण्यात आला आहे. या गाळ काढण्याच्या नवीन पद्धतीमधून वडाळे तलावाची सफाई होईल याची खात्री नाही परंतु नगर परिषदेच्या तिजोरीची सफाई नक्कीच होईल, अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.
पनवेल शहराच्या पायाभूत सुविधांवर देखरेखीसाठी नगर परिषदेची यंत्रणा काम करते. परंतु नगर परिषदेने प्रत्येक विकास कामाच्या गुणवत्तेमध्ये लोकहित जपण्यापेक्षा स्वहित जपण्याची पनवेल नगर परिषदेमधील काही अधिकाऱ्यांची परंपरा आहे. याच परंपरेमुळे या नगर परिषदेतील माजी मुख्याधिकाऱ्यांपासून ते बांधकाम विभागातील अभियंत्यांना रंगेहाथ लाच घेतल्यामुळे घरी जावे लागले होते. सध्या शहरातील वडाळे तळ्यांच्या स्वच्छतेचा मुद्दा शहरात चांगलाच रंगला आहे. गाळ काढण्यासाठी मशीन किती तास काम करते या तासांवर तळ्यातील गाळ काढण्याच्या कामाला परवानगी मिळाली आहे. मात्र मागील २० दिवसांपासून वडाळे तलावाजवळ दुपारची ही मशीन बंद असते त्यामुळे गाळ काढण्याचे काम संथगतीने सुरू असल्याचे नागरिक सांगतात. तसेच गाळ काढणाऱ्या मशीनने हा गाळ तळ्याजवळच साचविल्याने पावसाच्या पाण्यात गाळ पुन्हा तळ्यात जाईल अशी येथे परिस्थिती आहे. दोन वर्षांपूर्वी समर्थाच्या दासभक्तांनी शहरातील तळे स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेऊन शहरातील स्वच्छतेचा धडा नगर परिषदेला दिला होता. या संपूर्ण घटनेबाबत नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश चितळे यांना विचारल्यावर त्यांनी सोमवारी दुपारी साडेचार वाजता घटनास्थळाची स्वत: जाऊन पाहणी केली. त्या वेळीही हा गाळ उपसण्याची मशीन बंद होती. चितळे यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊनच बोलू असे सांगितले. तसेच वडाळे तलावामधील कामासाठी रोटरी क्लबच्या सहकार्यानेही तलावात दुसऱ्या बाजूला काम सुरू असल्याचे सांगितले. मशीन किती तास चालेल याच निकषावर संबंधित कंत्राटदाराला बिल देण्याचे ठरले असून या कामाचे बिल राखून ठेवण्यात आल्याचे चितळे यांनी स्पष्ट केले.