पालिकेची २०० कोटींची तरतूद असूनही अल्प निधीचा वापर; सर्वसाधारण सभेत लक्षवेधी

नवी मुंबई नवी मुंबई पालिकेची आरोग्य सेवा सध्या ‘अत्यवस्थ’ आहे. तिला किमान ‘सलाइन’वर तरी आणा, अशी मागणी करीत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी आरोग्य विभागावर टीकेची झोड उठवली. पालिकेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत आरोग्याचा प्रश्न गाजला.

विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी आरोग्यावर लक्षवेधी मांडली. त्यांनी आरोग्य सेवा दिवसेंदिवस कशी ढासळत आहे, त्याबाबत नाराजी व्यक्त केली. आरोग्य सेवेसाठी १५०-२०० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात आहे. तरीही प्रत्यक्षात हा निधी खर्च झालेला नाही. जनतेच्या आरोग्यावर पालिका खर्च करीत नसेल तर तिजोरीत शिल्लक वाढवून काय उपयोग आहे, असा सवाल या वेळी चौगुले यांनी केला.

७० टक्के रुग्ण हे शहराबाहेरील असतात, शहरातील रुग्णांना जागा उपलब्ध नसल्याने पालिकेचे औषधोपचार घेता येत नाहीत. महापालिकेने २०१६ मध्ये एक वर्षांसाठी ‘केपीएमजी’ या संस्थेची सल्लागार म्हणून नेमणूक केली होती, मात्र त्या संस्थेला वारंवार मुदतवाढ देण्यात येत आहे. परंतु आजवर त्या संस्थेने काय काम केले, याची माहिती कुठेही प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.  रुग्णालयात स्वच्छता आहे का? शौचालय सुस्थितीत आहेत का? पालिका रुग्णालयात रुग्णांना चांगल्या सुविधा उपलब्ध होत आहेत का? आहारतज्ज्ञ उपलब्ध आहेत का? महापालिकेत सतर्कता विभाग असायला हवा, असे मत नगरसेवक जयाजी नाथ यांनी व्यक्त केले.

बऱ्याचदा पालिका रुग्णालयात शहरातील रुग्णांना खाटा उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. रुग्णालयात डॉक्टर कर्मचारी रुग्णांकडे लक्ष देत नसतील. हलगर्जी करीत असतील तर त्याला जबाबदार कोण? खासगी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनाही पालिकेच्या रुग्णालय सेवेत सामावून घ्या, अशी सूचना नगरसेवक सुनीता मांडवे यांनी केली. पालिका रुग्णालयात क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण येत असतात. केशरी शिधापत्रिकेवर अनेक शासकीय उपचार उपलब्ध आहेत. आयुषमान योजने अंतर्गत अनेक सुविधा उपलब्ध आहेत, अल्प दरात शस्त्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध आहेत, मात्र या शासकीय आरोग्य योजना नागरिकांना माहितीच नाहीत, त्याबाबत पालिका स्तरावर जनजागृती करावी, असे किशोर पाटकर म्हणाले.

यूएचपी अधिकार वाढवा, त्यांना अधिकार दिले तर त्या ठिकाणी रुग्णांचे निदान होईल. यूएचपी केवळ औषध फवारणी करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे देखील पालिका रुग्णालयावरील ताण कमी होईल, असे सोमनाथ वास्कर यांनी सांगितले.

आरोग्यनामा

-गावठाण व झोपडपट्टी भागांत आजही अस्वच्छता दिसत आहे. त्यामुळे विविध आजारांचा फैलाव झालेला आहे. शहरातील रुग्णांसाठी राखीव जागा ठेवावी आणि शहराबाहेरील रुग्णांना वेगळी जागा राखीव ठेवावी, अशी सूचना त्यांनी केली.

-पालिका रुग्णालयांत डॉक्टरांची वानवा आहे. त्यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाहीत. नवी मुंबई शहरातील सर्व खासगी रुग्णालयांतील प्रत्येक क्षेत्रातील तज्ज्ञांची यादी करून त्यांना पालिका रुग्णालय सेवेत समावून घेण्याचे नियोजन केले, तर आरोग्यसेवेवर त्याचा ताण येणार नाही. तसेच आरोग्य समितीची मुदत संपूनही नव्याने पद भरती का केली गेली नाही, अशी विचारणा केली.

-आरोग्य विभागाच्या कामावर ताशेरे ओढत पालिका रुग्णालयातील डॉक्टर हे उपचारासाठी उपलब्ध होत नसून ते निविदा प्रक्रियेत गुरफटलेले असतात. त्यांना रुग्णांची तपासणी करण्यासाठी वेळ उपलब्ध नसतो, त्यामुळे या विभागातील निविदा प्रक्रिया करण्यासाठी इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी नगरसेवक नामदेव भगत यांनी केली.

डॉक्टरांची, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांच्या जागा भरण्याची प्रक्रिया झाली आहे. पालिका सदस्यांनी मांडलेल्या सर्व सूचना लक्षात घेऊन त्यावर अंमलबजावणी करावी.  पुढील काळात आरोग्यावर लक्षवेधी येणार नाही, याचे प्रशासनाने प्रयत्न करावेत.

-जयवंत सुतार, महापौर

निवड केलेले उमेदवार कायमस्वरूपी काम करण्यासाठी तयार आहेत. तो प्रस्ताव महासभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. खासगी रुग्णालयातील तज्ज्ञही सेवेत येण्यास तयार आहेत आणि येत्या १० ते १५ दिवसांत त्याचा निर्णय येईल.

-अण्णासाहेब मिसाळ, पालिका आयुक्त

ऐरोली आणि नेरुळमधील दवाखान्यात एनआयसीयू विभाग सुरू केले आहेत. बेलापूर रुग्णालयात नैसर्गिक प्रसूतीची सुविधा सुरू करण्यात आली आहे. आवश्यक पदांची भरती प्रकिया सुरू आहे.

-बाळासाहेब सोनावणे, वैद्यकीय अधिकारी, पालिका