जेएनपीटी बंदराकडे जाणाऱ्या कंटनेरचा ताण नवी मुंबईतील रस्त्यांवर येत असून उरण फाटय़ापासून पालिका मुख्यालयाकडे जाणाऱ्या आम्रमार्गावर अवजड वाहनांमुळे खड्डे पडले आहेत. किल्ले गावठाण चौक तसेच त्यामागील रस्त्यावर रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने तिथे कोंडी होत आहे. त्यातच या मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाची व पालिका मुख्यालयासमोरील रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावर सतत कोंडी होत आहे.

शीव-पनवेल महामार्गावरून उरण फाटय़ापासून पालिका मुख्यालयापर्यंत जाणाऱ्या आम्रमार्गावर जेएनपीटीच्या कंटेनरची वाहतूक मोठय़ा प्रमाणात सुरू असते. मार्गाच्या दोन्ही बाजूंना रहिवासी वस्ती आहे. एकीकडे एकता विहार, दुसरीकडे भीमाशंकरसह मोठमोठय़ा सोसायटय़ा आहेत. मार्गाच्या बाजूलाच नेरुळमधील रायन इंटरनॅशनल शाळा आहे. पुढे वंडर्स पार्क आहे. याच मार्गावरून पारसिक हिलवरील महापौर निवासाकडे जाता येते. मुख्यालयाकडे जाताना रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलावरील रस्त्यांची चाळण झाली आहे.

किल्ले गावठाण चौकात कंटेनरच्या रांगांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. पालिका मुख्यालयात नागरिक, कर्मचारी किल्ले गावठाण चौकातून मुख्यालयात जातात. त्यामुळे हा चौकही धोकादायक व अतिवर्दळीचा झाला आहे. या ठिकाणी उड्डाणपुलाचे काम सुरू असून त्यातच रस्त्याची दुरवस्था झालेली असल्याने हा मार्ग अधिकच धोकादायक बनू लागला आहे.

आम्रमार्गावरील रेल्वेपुलावर व किल्ले गावठाण उड्डाणपुलाच्या नव्याने सुरू असलेल्या कामाच्या परिसरातही खड्डे पडले आहेत. खड्डे बुजवण्याचे काम सातत्याने केले जात आहे. डांबरीकरणाचे प्रस्तावित आहे.

– पंढरीनाथ चौडे, अभियंता, नवी मुंबई महापालिका