News Flash

एक हजार लाभार्थीना पहिल्या टप्प्यात घरांचा ताबा

केंद्र सरकारच्या सर्वासाठी घरे या योजनेची अंमलबजावणी करताना राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी सिडकोच्या माध्यमातून महागृहनिर्मितीची घोषणा केली होती.

आतापर्यंत एकही हप्ता न भरणाऱ्यांना जुलैअखेपर्यंत मुदतवाढ

नवी मुंबई : खारघर, तळोजा, कळंबोली, घणसोली आणि द्रोणागिरी या पाच नोडमध्ये बांधण्यात येत असलेल्या सुमारे २५ हजार घरांचा ताबा सिडको एक जुलैपासून टप्प्याटप्प्याने देणार असून आतापर्यंत सर्व हप्ते आणि देखभाल शुल्क भरलेल्या एक हजार लाभार्थीना सिडको महागृहनिर्मितीतील घरांचा प्रत्यक्षात ताबा देणार आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये देण्यात येणारा घरांचा ताबा यावर्षी जुलैमध्ये दिला जात असून सर्व प्रकारची देयके भरलेल्या ग्राहकांना हा ताबा दिला जाणार आहे. कोविड काळात आकारण्यात आलेला दंड सिडकोने यापूर्वीच माफ केलेला आहे, तर ज्या ग्राहकांनी आतापर्यंत एकही हप्ता किंवा काही हप्ते भरलेले नाहीत त्यांना जुलैअखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

केंद्र सरकारच्या सर्वासाठी घरे या योजनेची अंमलबजावणी करताना राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी सिडकोच्या माध्यमातून महागृहनिर्मितीची घोषणा केली होती. त्यातील २५ हजार घरांचे सध्या बांधकाम सुरू असून त्यांची सोडत २०१८-१९ मध्ये काढण्यात आली होती. या घरातील पहिल्या टप्प्यातील सुमारे चार हजार घरांचा ताबा हा ऑक्टोबर २०१९ मध्ये देण्यात येईल, असे सिडकोने अर्ज पुस्तिकेमध्ये स्पष्ट केले आहे. मात्र करोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर सिडकोच्या पाच नोडमध्ये सुरू असलेली इमारतींची बांधकामे ठप्प झाली. लवकर घर मिळावे यासाठी मार्च एप्रिलपर्यंत काही लाभार्थीनी बँक कर्ज घेऊन घरांचे सर्व हप्ते भरून टाकले होते. त्यामुळे घरांची रक्कम मिळाली पण ताबा न मिळाल्याने सर्व हप्ते भरलेले ग्राहक नाराज होते. त्यात सिडकोने दोन मुदत जाहीर केल्या होत्या पण त्या पूर्ण करणे शक्य झाले नाही. याच काळात करोनाची दुसरी लाट पसरू लागली आणि राज्य सरकारने एप्रिलमध्ये पुन्हा कडक निर्बध लागू केले. त्यामुळे पुन्हा या बांधकामांचा वेग मंदावला. सर्व हप्ते भरलेल्या ग्राहकांची नाराजी वाढू लागल्याने सिडकोने या बांधकामांचा वेग वाढवला असून जुलैपासून टप्प्याटप्प्याने सर्व रक्कम भरलेल्या ग्राहकांना घरांचा ताबा दिला जाईल, असे जाहीर केले आहे. त्यानुसार जूनअखेपर्यंत सर्व हप्ते भरलेल्या पण देखभाल दुरुस्तीचा शेवटची रक्कम न भरलेल्या ग्राहकांना सिडकोने नोटिसा पाठविण्यास सुरुवात केली असून घराचे सर्व हप्ते भरलेले सुमारे पाच हजार लाभार्थी आहेत. सिडकोने पहिल्या टप्यात १४ हजार ८३८ घरांची सोडत काढली होती. त्यातील सात हजार ग्राहक हे विविध कारणांस्तव अपात्र ठरले असून त्यांच्या जागी प्रतीक्षा यादीवर असलेल्या ग्राहकांना संधी देण्यात आली आहे. या महिन्यात सर्व हप्ते भरलेल्या लाभार्थीना देखभाल दुरुस्तीची रक्कम भरण्याची अंतिम नोटीस दिली जात असून आतापर्यंत एक हजार लाभार्थीनी सर्व हप्ते व देखभाल दुरुस्ती रक्कम भरलेली आहे. त्यामुळे त्यांना पहिल्या टप्प्यात घरे दिली जाणार असून सिडकोबरोबर करारनामा आणि शासकीय नोंदणी हे एकाच वेळी होणार आहे.

जूनअखेपर्यंत ग्राहकांची संख्या वाढणार?

सर्व हप्ते भरलेल्या ग्राहकांचा किमान या करोनाकाळात देखभाल खर्च तरी माफ व्हावा यासाठी नवी मुंबई मनसेने सह्य़ांची तसेच समाजमाध्यमांवर मोहीम सुरू केली होती पण या स्टंटबाजीला ग्राहकांनी फारसा प्रतिसाद दिलेली नाही, असे स्पष्ट दिसून येते. सर्व हप्ते भरलेल्या ग्राहकांना पुढील देखभाल दुरुस्तीसाठी ५८ हजार रुपये भरून आता घरांचा ताबा मिळणार असेल तर या वादात न पडता लाभार्थीनी देखभाल खर्च भरण्यास सुरुवात केली आहे. देखभाल खर्च हा पुढील काळासाठी आहे. करोनाकाळात सिडकोने आकारलेली दंड माफ केलेला आहे. सध्या एक हजार ग्राहक असून जून अखेपर्यंत ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.

महागृहनिर्मितीतील लाभार्थीना जुलैपासून घरे देण्याचे वेळापत्रक तयार केले असून त्यानुसार कामकाज सुरू आहे. या महिन्यात सर्व हप्ते भरलेल्या किंवा शिल्लक असलेल्या ग्राहकांना हप्ते व देखभाल खर्च भरण्याची नोटीस देण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी मोठय़ा प्रमाणात सिडकोने घरांचा ताबा दिलेला नाही. त्यामुळे हे काम योजनाबद्ध करावे लागत आहे.

डॉ. संजय मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2021 3:18 am

Web Title: possession houses thousand beneficiaries first phase ssh 93
Next Stories
1 विमानतळ नामकरणासाठी गावबैठका
2 महापे-कोपरखरणे मार्गावर अपघात
3 मुखपट्टीधारी चोर पोलिसांसाठी डोकेदुखी