दुष्काळी स्थितीचा परिणाम; रमजानमध्ये दरवाढीची शक्यता

विकास महाडिक, नवी मुंबई</strong>

उत्तर व पश्चिम महाराष्ट्रातून वाशीतील एपीएमसी बाजारात रमजान काळात येणाऱ्या पपई, कलिंगड, डाळिंब, अननस आणि टरबूज या फळांची आवक घटली आहे. त्यामुळे मंगळवारपासून

सुरू होणाऱ्या रमजानचा दिवसभराचा रोजा सोडण्यासाठी लागणाऱ्या या पाणीदार फळांचे दरही वाढणार आहेत.  अनेक वर्षांनी कोकणातील हापूस आंब्याचा आस्वाद रोजा सोडताना घेता येणार असून त्याचीही आवक कमी असल्याने तो महाग झाला आहे.

मंगळवारपासून रमजान मासांरभ सुरू होत आहे. या काळात मुस्लीम बांधवात पहाटेपासून ठेवण्यात आलेले रोजा संध्याकाळी सोडण्याची प्रथा आहे. रोजा सोडताना सर्वसाधारपणे जड पदार्थ न खाता ज्यात पाण्याचे प्रमाण जास्त आहे ती फळे खाण्याची एक पद्धत प्रचलित आहे. दिवसभर पाण्याचा एक थेंब न पिण्याचाही रोजा काळात पाळला जातो. त्यामुळे संध्याकाळी रोजा सोडताना पपई, पपणीस, डाळिंब, कलिंगड, अननस, टरबूज या पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या फळांना मागणी असते. पश्चिम व उत्तर महाराष्ट्रातील काही शेतकरी याच रमजान महिन्यात ही फळे बाजारात पाठविण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळे या फळांना चांगला भाव मिळण्याची अपेक्षा असते. यंदा या फळांवर पाणी टंचाईचे संकट आहे. त्यामुळे रमजान काळात येणाऱ्या या पाणीदार फळांची आवक निम्म्यावर आली असून त्यांचे दर वाढत आहेत.

घाऊक बाजारात कलिंगड १५ ते २० रुपये किलोवर गेले असून अननस तर ५० ते ६० रुपये किलो दराने विकले जात आहेत. भाववाढीमुळे मोठय़ा प्रमाणात रोजा सोडण्यासाठी विक्री केल्या जाणाऱ्या फळांना सर्वसामान्यांकडून उठाव कमी येऊ लागला आहे. येत्या महिन्याभरात ही झळ आणखी वाढणार असून रोजा सोडताना इतर स्वस्त फळांचा आधार घ्यावा लागणार आहे.

* रोजा सोडताना या पाणीदार फळांचा वापर जास्त केला जातो. या फळांची आवक मंदावल्याने त्यांची दरवाढ या राजकीय पक्षातील संभाव्य उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांना खिशाला झळ पोहोचविणाऱ्या ठरणार आहेत.

हापूसचा स्वाद घेता येणार

रमजान महिना दरवर्षी १५ दिवसांनी अलीकडे सरकत असतो. गेल्या वर्षी तो २५ मे नंतर सुरू झाला होता. त्यामुळे रत्नागिरीतील हापूस आंब्याचा विशेषत: देवगडचा मोसम संपत आला होता. यंदा हा महिना ७ मे पासून सुरू होत असल्याने तब्बल १५ वर्षांनी रोजा सोडताना देवगडच्या हापूस आंब्याचा स्वाद घेता येणार आहे. हा मोसम २० मे नंतर संपण्याची शक्यता असून त्यानंतर गुजरातचा हापूस आंबा सुरु होणार आहे.

निम्याने आवक घटली

फळ    गेल्या वर्षीची आवक     यंदाची आवक

पपई    २६ ते ३० ट्रक                 ५ ते ६ ट्रक

कलिंगड ८० ते ९० ट्रक              २५ ते ३० ट्रक

डालिंब  ३० ते ४० ट्रक                १५ ते २० ट्रक

अननस ५० ते ६० ट्रक               ६ ते ७ ट्रक

टरबूज  ७० ते ७५ ट्रक                 १० ते २०ट्रक

उत्तर व पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुष्काळजन्य स्थिती आहे. पिण्याच्या पाण्याचा ठावठिकाणा नाही तर शेतीला पाणी द्यायचे कुठून, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. पाणीदार फळांना पाणी जास्त लागत असल्याने त्याचे उत्पादन शेतकऱ्यांनी टाळले आहे. यंदा ही पाणीदार फळांची आवक घटली आहे. काही फळांच्या बागा शेतकऱ्यांनीच उखडून टाकलेल्या आहेत.

– संजय पानसरे, फळ व्यापारी, एपीएमसी बाजार, वाशी