वाशीतील इमारतीच्या रखडपट्टीमुळे जुने कंत्राट रद्द, नवा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत

वाशी सेक्टर ३ येथील पोलीस स्टेशनच्या बाजूला बांधण्यात येणाऱ्या समाजमंदिराच्या बहुउद्देशीय इमारतीसाठी पुन्हा कंत्राट देण्यात येण्याची शक्यता आहे. या आधी २०१४ साली कंत्राट देण्यात आले होते, मात्र ते रखडल्यामुळे इमारत अनेक वर्षे अर्धवट स्थितीत पडून होती. पालिका आयुक्तांनी जुना ठेका रद्द केला असून नवा प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी येणार आहे.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विविध सामाजिक, धार्मिक आणि कौटुंबिक समारंभांसाठी सामान्यांना परवडेल अशा दरात सभागृह मिळणे अवघड झाले आहे. सिडकोने बांधलेली समाजमंदिरे वाढत्या लोकसंख्येपुढे अपुरी पडत आहेत. सिडकोने ज्या वेळी नवी मुंबई शहर निर्माण केले, त्या वेळी शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या वाशीत हे समाजमंदिर बांधले. या वास्तूत शहराच्या साहित्य व कला क्षेत्राची जपणूक करण्याचे काम विविध संस्था करत होत्या. २०१४ साली या ठिकाणी समाजमंदिर व बहुउद्देशीय इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. या इमारतीत पूर्वीपासून असलेल्या विविध सामाजिक, कला, साहित्य क्षेत्रातील संस्थांना याच नव्या इमारतीत सामावून घेण्याचे धोरण निश्चित करण्यात आले होते. त्यामुळे आजही या संस्था वाशी नागरी आरोग्य केंद्र व परिसरातील छोटय़ा जागांत आपले अस्तित्व टिकवून आहेत. नवीन समाजमंदिरासह बहुउद्देशीय इमारत बांधण्यासाठी सुमारे १३ कोटी ४१ लाखांच्या कामाला डिसेंबर २०११ मध्ये महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. रीतसर निविदा प्रक्रिया पार पाडून मे. महावीर रोड्स अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.ला ४ मार्च २०१४ रोजीच्या कार्यादेशान्वये रक्कम १८,०६,००,८८२ रुपये खर्चाचे कंत्राट देण्यात आले होते. परंतु या बांधकामात कंत्राटदाराने अतिशय विलंब केला. त्यामुळे थोडेसे काम केल्यानंतर आजतागायत या ठिकाणी कोणतेच काम झाले नव्हते. त्यामुळे नागरिकांना लवकरात लवकर ही सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने त्यांचे कंत्राट रद्द करण्यात आले आहे.

या ठिकाणचे काम नव्याने लवकर सुरू न केल्यास उपोषण करण्याचा इशारा स्थानिक नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी पालिका प्रशासनाला दिला होता. समाजमंदिराची गरज बघता महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी या कामाचा नवीन प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना अभियांत्रिकी विभागास दिल्या होत्या त्यानुसार नवीन प्रस्तावास प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. आता हा प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी येणार आहे.

इमारतीचे स्वरूप

* भूखंड क्रमांक १२, १३ वर २०६२.६५ चौ.मी. क्षेत्रफळात इमारत उभारण्यासाठी १७ कोटी ५४ लाखांचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

* चार मजली बहुउद्देशीय इमारत तळघरामध्ये वाहनतळ व्यवस्था, तळमजल्यावर वाहनतळासह कार्यालय, पहिल्या व तिसऱ्या मजल्यावर सभागृह, भांडारगृह, वेशभूषा कक्ष उभारण्यात येणार आहे.

* दुसऱ्या व चौथ्या मजल्यावर सभागृह, भांडारगृह, वेशभूषा कक्ष तसेच सर्वच मजल्यांवर स्त्री-पुरुष प्रसाधनगृह बांधण्यात येणार आहेत.

जुन्या ठेकेदाराने काही प्रमाणात काम पूर्ण न केल्यामुळे प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे. नव्याने या प्रस्तावास मान्यता मिळाली असून प्रस्ताव मंजुरीसाठी महासभेकडे पाठवण्यात येणार आहे.

– मोहन डगावकर, शहर अभियंता, नमुंमपा

सिडकोने नवी मुंबई शहराची निर्मिती केल्यानंतर अगदी सुरुवातीपासून जुन्या समाजमंदिरामध्ये शहरातील प्रसिद्ध टाऊन लायब्ररी सुरू करण्यात आली होती. या जागेवर भव्य बहुउद्देशीय इमारत बांधण्यासाठी विविध संस्थांना तात्पुरती जागा बदलावी लागली, परंतु अनेक वर्षांपासून हे काम बंदच होते, आता नव्याने समाजमंदिराचे काम होईल व आम्हाला हक्काची जागा मिळेल, या प्रतीक्षेत आहोत. त्यामुळे लवकरात लवकर ही इमारत पूर्ण व्हावी ही जुन्या समाजमंदिरात असलेल्या संस्थांची अपेक्षा आहे.

– विजय केदारे, सचिव, टाऊन लायब्ररी, वाशी

अनेक वर्षांपासून ठेकेदाराने काम बंद ठेवल्याने वाशीसारख्या महत्त्वाच्या ठिकाणाचे काम रखडले होते. यासाठी आयुक्तांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर जुना प्रस्ताव रद्द करून नवीन प्रस्ताव आला आहे. लवकरात लवकर देखणी इमारत उभी राहून नागरिकांना त्याचा फायदा व्हावा, अशी मागणी आहे.

– दिव्या गायकवाड, स्थानिक नगरसेविका