12 December 2017

News Flash

शीव-पनवेल महामार्गावर खड्डय़ाची टोलवाटोलवी

शीव-पनवेल महामार्गावर कळंबोली सर्कलच्या अलीकडे एक धोकादायक खड्डा निर्माण झाला आहे.

प्रतिनिधी, पनवेल | Updated: May 13, 2017 1:36 AM

वारंवार सूचना करूनही सायन-पनवेल टोलवेज कंपनीचे दुर्लक्ष

१ हजार २०० कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या शीव-पनवेल महामार्गावर कळंबोली सर्कल येथे एका खड्डा पडला आहे. सायन-पनवेल टोलवेज कंपनीला वारंवार सूचना करूनही कंपनी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी दिली.

शीव-पनवेल महामार्गावर कळंबोली सर्कलच्या अलीकडे एक धोकादायक खड्डा निर्माण झाला आहे. या खड्डय़ामुळे अपघात होत आहेत. महामार्गावरील खड्डे बुजवण्यात यावेत आणि पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्याची सोय करावी, यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत आहे, असे वाहतूक विभागाचे म्हणणे आहे. बुधवारी नवीन पनवेल येथे राहणाऱ्या अ‍ॅड. जयमाला औस्तवाल या चारचाकी वाहनातून कुटुंबासोबत मुंबईहून घरी येत होत्या. कळंबोली सर्कल येथील या खड्डय़ात त्यांच्या कारचे चाक आदळले. सिग्नलच्या पुढे लगेचच हा खड्डा असल्यामुळे अनेक वाहने त्यात आदळतात. ज्यांना त्यामुळे दुखापत होते, ते पोलिसांकडे तक्रार करतात. पोलीस ही समस्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मांडतात, मात्र प्रश्न कायम राहतो.

याबाबत सायन पनवेल टोलवेज कंपनीचे अधिकारी गोपाळ गुप्ता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सरकारने हा रस्ता टोलमुक्त केल्यामुळे कंपनीला नुकसान झाल्याचे सांगितले. हा प्रश्न सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मांडावा, असे सुचवले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी याबाबत संपर्क होऊ शकला नाही.

अनेक त्रुटी

सायन-पनवेल टोलवेज कंपनीने शीव-पनवेल महामार्ग बांधला आहे. हा मार्ग बांधताना अनेक त्रुटी राहिल्या आहेत. मार्ग खुला होऊन दोन वर्षे उलटली तरी खारघर, रोडपाली, कामोठे व कळंबोली येथील भुयारी मार्ग सुरू झालेले नाहीत. कामोठे वसाहतीमधील नागरिकांना पनवेल-शीव महामार्ग थेट गाठता येण्याची सोय महामार्ग बांधणाऱ्यांनी केलेली नाही. येथील नागरिकांना दीड किलोमीटरचा वळसा घेऊन महामार्ग गाठावा लागतो. आमदार प्रशांत ठाकूर यांनी अनेकदा प्रयत्न करूनही हा प्रश्न सुटलेला नाही. सरकारमधील मंत्री विधिमंडळात आश्वासने देतात, मात्र प्रत्यक्षात दोषी कंपन्यांवर कोणतीही कारवाई होत नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

अभियंत्यांचे हात वर

या रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या सूचना सायन-पनवेल टोलवेजला देऊनही कंपनीकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कंपनीवर कारवाई करण्यात यावी, असा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवला आहे, मात्र त्यांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही, असे सांगत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याने हात वर केले आहेत.

First Published on May 13, 2017 12:54 am

Web Title: potholes issue on sion panvel highway