खारघर, कोपरा येथे अपघातांत वाढ; सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन

शीव-पनवेल मार्गावरील खड्डय़ांमुळे वाहतूक नियमनात अडथळे येत असून त्यामुळे वाहतूक पोलीस त्रस्त झाले आहेत. खारघर हिरानंदानी येथे वर्षभरापासून मोठे खड्डे पडलेले आहेत. कोपरा पूल परिसरातही बिकट अवस्था आहे. त्यामुळे अपघातांचे प्रणाम वाढले आहे, असे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे. पावसाळ्यात या खड्डय़ांत पाणी साचून समस्या अधिकच बिकट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी, म्हणून खारघर वाहतूक पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले आहे.

हिरानंदानी परिसराती आणि कोपरा पूल येथील रस्त्याची गेल्या वर्षी ऐन पावसाळ्यात दोनदा डागडुजी करण्यात आली. मात्र वरवरची मलमपट्टी करण्यात आल्याने दोन दिवसांत स्थिती जैसे थे झाली. कोपरा पूल येथे तात्पुरते बसविलेले पेव्हर ब्लॉकाही उखडले गेले. काही दिवसांपूर्वी याठिकाणी एका ट्रकचा अपघात झाला होता. कोपरा पूल हा खारघर शहरात प्रवेश करण्यासाठी मुख्य रस्ता आहे. त्यामुळे या ठिकाणी जास्त वाहतूककोंडी होते.

सायन-पनवेल टोलवेज लिमिटेड आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला याविषयी वारंवार निवेदने देण्यात आली आहेत, तरीही तोडगा निघत नसल्याची माहिती खारघर येथील वाहतूक पोलीस निरीक्षक प्रवीण पांडे दिली. आता पावसाळा सुरू झाला असून पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले आहे. खारघर हिरानंदानी येथील रस्ता खड्डेमुक्त करणे, कोपरा पूल येथील पेव्हर ब्लॉक काढणे, लेन मार्किंग करणे, महामार्गावरील बंद पथदिवे सुरू करणे इत्यादी मागण्यात करण्यात आल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

खारघर येथील खड्डय़ांमुळे वाहनचालक, प्रवासी आणि वाहतूक पोलीस हतबल झाले आहेत. वाहतूककोंडी होत आहे. अपघातांचे प्रमाण खूप वाढले आहे. दोन्ही प्राधिकरणांच्या आर्थिक वादात सामान्य नागरिक भरडला जात आहे.

प्रवीण पांडे, वाहतूक पोलीस निरीक्षक, खारघर