नवी मुंबई :  शीव-पनवेल महामार्गावर यंदा पावसाच्या तडाख्याने मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहेत. पालिका हद्दीतील उड्डाणपुलाखालील भागात सर्वाधिक खड्डे पडले आहेत. त्यामुळे शहरांतर्गत वाहतुकीवर त्याचा परिमाण झाला आहे. वाशी आणि तुर्भे उड्डाणपुलाखालील खड्डे युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम गुरुवार सकाळपासून हाती घेण्यात आले होते. मात्र पावसाच्या माऱ्याने खड्डय़ातील खडी किती काळ तग धरून राहील, याविषयी शंका व्यक्त केली जात आहे.

महामार्गावरील वाशी, तुर्भे, शिरवणे आणि नेरुळ या सर्वच उड्डाणपुलांखालील चौकात मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहेत. या सर्वच ठिकाणी डांबरी रस्ते आहेत. बुधवारी जोरदार पावसामुळे खड्डय़ांच्या संख्येत भर पडली. वाशी प्लाझा उड्डाणपुलाखालील रस्त्यावरील खड्डय़ांमुळे अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. खड्डे भरण्याचे काम दिवसभर सुरू होते.

रस्ते दुरुस्ती ऐन पावसात शक्य नसल्याने सध्या फक्त खडी  टाकून भराव केला जात आहे. यात वाहनचालकांता त्रास वाचण्याऐवजी त्यांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. खड्डय़ात साठलेल्या पाण्यामुळे खड्डा किती खोल आहे, याचा अंदाज येत नसल्याने दुचाकींना अपघात घडण्याची शक्यता आहे.

टाळेबंदीतील काही नियम शिथिल केल्यानंतर गुरुवारी मुंबईकडे जाणाऱ्यांची संख्या अधिक होती. या खड्डय़ांमुळे वाशी प्लाझा चौकात खड्डे मोठय़ा प्रमाणात असल्याने वाहने अत्यंत धिम्या गतीने जात होत्या. यात वारंवार वाहतूक कोंडी झाली होती.

काही ठिकाणी यंत्राद्वारे रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरू होते. त्यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडली. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने खड्डे भरण्याच्या कामाला वेग आला होता. अशी माहिती वाशी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास खटावकर यांनी दिली.