५० टक्केच ग्राहकांकडून ऑनलाइन सुविधांचा वापर

महावितरणने १ फेब्रुवारीपासून वीजदेयकावर वीज वापाराचा तपशील छायाचित्राऐवजी ग्राहकांच्या मोबाइलवरील अ‍ॅपवर देणे सुरू करण्यात येणार आहे. नवी मुंबईत ८६ टक्के ग्राहकांची मोबाइल क्रमांकाची नोंदणी झाली आहे. त्यातील ५० टक्के ग्राहक ऑनलाइन सुविधांचा उपयोग करीत आहेत. त्यामुळे ही सुविधा सर्व ग्राहकांपर्यंत कशी पोहोचविण्यात येणार, असा सवाल केला जात आहे.

गेली काही वर्षे महावितरणकडून वीज मीटरचे छायाचित्र काढून गणन देयकावर दाखविण्यात येत आहे. परंतु ही पद्धती पूर्ण निर्दोष नसल्याने देयकावर मीटर गणनाचे पुसट छायाचित्र छापले जात होते. यात मीटरचे गणन नीट दिसत नव्हते. येत्या काळात नवी पद्धत सुरू केली जाणार आहे. मात्र महावितरणच्या ऑनलाइन सुविधेपासून अनेक ग्राहक वंचित आहेत.

नवी मुंबई सध्या आठ लाख ७५ हजार वीज ग्राहक आहेत. त्यापैकी ८६ टक्के ग्राहकांनी क्रमांकाची नोंदणी केली आहे. त्यातील केवळ ५० टक्के ग्राहक ऑनलाइन सुविधांचा वापर करीत आहेत. दुर्बल घटक, झोपडपट्टी परिसरातील, तसेच आदिवासी पाडय़ांतील ग्राहकांना आजही शिक्षणा अभावी वा संगणकीय सुविधा उपलब्ध नसल्याने ऑनलाइन सुविधांचा उपयोग करून घेणे शक्य नाही, त्यामुळे अशा घटकांपर्यंत मीटर गणन पोहोचण्यात अडचणी निर्माण होतील, असे मत यातील जाणकार व्यक्त करीत आहेत.

महावितरण मीटर रीडिंगचा फोटो काढणार आहे, मात्र ते वीजदेयकावर न देता ऑनलाइन उपलब्ध करून देणार आहे.  वीजदेयकावरच छायाचित्र स्पष्ट स्वरूपात दिसेल अशी तरदूत महावितरणने का केली नाही, मीटरचा फोटो ऑनलाइन तर उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असा प्रश्न वीज ग्राहक सुनीता बनसोडे यांनी उपस्थित केला आहे

मीटर वाचनाची ऑनलाइन सुविधा फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. मात्र झोपडपट्टी, आदिवासी पाडय़ातील ग्राहकांचे आजही मोबाइल नंबर नोंदणी नाही. मोबाइल नोंदणीबाबत आम्ही वारंवार सूचना करीत आहोत.

-एस बी मानकर, अभियंता, महावितरण, नवी मुंबई</p>