News Flash

मुंढेंच्या नाकाबंदीसाठी रस्त्यावरही शक्तिप्रदर्शन

मुंढे यांच्याविरोधात सर्वपक्षीय नगरसेवकांचे बहुमत असल्याने अविश्वास ठराव मंगळवारी मंजूर होईल हे स्पष्ट आहे.

नवी मुंबई महानगरपालिका

गर्दी जमविण्याचे शिवसेना नगरसेवकांना आदेश

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर अविश्वासाचा ठराव आणत त्यांच्यावर सर्वपक्षीय हल्लाबोल करण्याची व्यूहरचना एकीकडे आखली जात असताना दुसरीकडे शहरातील फेरीवाले, ग्रामीण भागातील प्रकल्पग्रस्त आणि सिडकोच्या अल्प उत्पन्न वसाहतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांची मोट बांधत त्यांनाही सभागृहाबाहेर मुंढेविरोधी मोहिमेत सहभागी करून घेण्याची रणनीती मुंढे हटवा समर्थक नेत्यांनी आखली आहे. मंगळवारी अविश्वास ठरावास मंजुरी मिळताच मुख्यालयाबाहेर मुंढेविरोधी निदर्शने करायची आणि बुधवारी प्रवेशद्वाराजवळ त्यांची वाट अडवायची असे आदेश शिवसेना नेत्यांनी पक्षाच्या नगरसेवकांना दिले आहेत. नेत्यांच्या आदेशामुळे नगरसेवकांचा एक मोठा गट अवाक झाला असून मुंढेविरोधी हा बालहट्ट पक्षाला कुठे घेऊन जाईल या चिंतेत सध्या ही मंडळी सापडली आहेत.

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्तपद स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढे येथील राजकीय नेत्यांना फारसे जुमानत नाहीत असेच चित्र होते. महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने काही गावांमधील बेकायदा बांधकामांविरोधात मोहीम सुरू करताच सर्वपक्षीय नेत्यांनी मुंढे यांच्याविरोधी भूमिका घेण्यास सुरुवात केली.

प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी घरांचा प्रश्न ऐरणीवर आला असताना मुंढेविरोधी आंदोलनात काही नेत्यांचा अपवाद वगळला तर शिवसेनेने पक्ष म्हणून तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती.

दरम्यानच्या काळात मुंढे यांनी शिवसेनेतील काही ज्येष्ठ नगरसेवकांची बेकायदा बांधकामप्रकरणी चौकशी सुरू केली. तसेच महापालिकेने काही वर्षांपूर्वी राबविलेल्या स्कॉडासारख्या प्रकल्पांच्या चौकशीची तयारी सुरू केली. यामुळे शिवसेनेचा नेता म्हणून मिरवणारा एक माजी सनदी अधिकारी अडचणीत येताच मुंढेप्रकरणी घुमजाव घेत शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केल्याचे चित्र पुढे आले.

तुकाराम मुंढे यांच्याविरोधात मांडण्यात आलेल्या अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करण्यासाठी सर्व नगरसेवकांना व्हीप बजाविण्यात आल्याचे खरे असले, तरी रस्त्यावरच्या लढाईसाठी ५० ते १०० समर्थक घेऊन या असे आदेश कुणालाही देण्यात आलेले नाहीत. लोकांमध्ये नाराजीचा सूर असल्याने ते स्वतहून मुख्यालय परिसरात जमले तर आश्चर्य वाटून घेण्याचे कारण नाही.

– विजय चौगुले, विरोधी पक्षनेते

मुंढेंना रोखणार

 मुंढे यांच्याविरोधात सर्वपक्षीय नगरसेवकांचे बहुमत असल्याने अविश्वास ठराव मंगळवारी मंजूर होईल हे स्पष्ट आहे. मात्र, एवढय़ापुरते न थांबता रस्त्यावरच्या लढाईला सज्ज राहा असे आदेश शिवसेना नेत्यांनी रविवारी रात्री उशिरा नगरसेवकांना दिले. मुंढे यांच्याकडून होणाऱ्या कारवाईमुळे फेरीवाले, गावांमधील बेकायदा बांधकामांचे आश्रयदाते नाराज आहेत. तसेच सिडकोने बांधलेल्या लहान घरांमधील वाढीव बांधकामांवरही मुंढे यांची वक्रदृष्टी होणार असल्याचे चित्र निर्माण करत या वसाहतींमधील रहिवाशांनाही मुंढेविरोधी मोहिमेत एकवटण्यात येत आहे. या सगळ्यांची एकजूट करत मंगळवारी महापालिका मुख्यालयावर शक्तिप्रदर्शन करायचे, असे आदेश शिवसेनेच्या नगरसेवकांना देण्यात आले आहेत. अविश्वास ठरावानंतर मुंढे यांची लागलीच बदली झाली नाही, तर बुधवारी त्यांना मुख्यालयात जाण्यापासून रोखायचे असा अजब आदेशही देण्यात आला आहे. हे आदेश पाळले नाहीत तर पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा असा दमही  भरण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2016 4:28 am

Web Title: power demonstrated on road against nmmc chief
Next Stories
1 शहरबात : सामान्यांचे प्रश्न सोडून सर्व काही..
2 कंत्राटी कर्मचारी सामूहिक रजेवर
3 मुख्यालयाभोवती २०० पोलिसांचा बंदोबस्त
Just Now!
X