23 September 2020

News Flash

कोपरखैरणेत पुन्हा काहिली

कोपरखैरणेतील सेक्टर-१९ सी, १८ व १६ तसेच सेक्टर- १ ते ४ मध्ये विद्युतपुरवठा नेहमीच खंडित होत असतो.

(संग्रहित छायाचित्र)

आठ तास वीजपुरवठा खंडित; उकाडय़ाने रहिवासी हैराण

नवी मुंबईत सर्वात जास्त वेळ आणि वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याची परंपरा कोपरखैरणेत कायम राहिली. बुधवारी कोपरखैरणे भागात विजेचा खेळखंडोबा सुरू होता. दुपारी तीन वाजता खंडित झालेला वीजपुरवठा मध्यरात्री एक वाजता पूर्ववत झाला. त्यामुळे कोपरखैरणेतील रहिवासी उकाडय़ाने घामाघूम झाले. लवकरच ऑक्टोबर हीट सुरू होत असून महावितरणचा विजेबाबतीत भोंगळ असा कायम सुरू राहिला तर काय, या विचारानेच कोपरखैरणेकरांची गाळण उडाली आहे.

कोपरखैरणेतील सेक्टर-१९ सी, १८ व १६ तसेच सेक्टर- १ ते ४ मध्ये विद्युतपुरवठा नेहमीच खंडित होत असतो. या स्थितीबाबत खासदार, आमदार आणि नगरसेवक यांनी महावितरणच्या कार्यालयात निवेदने दिली आहेत. मात्र त्याचा कोणताही परिणाम महावितरणच्या अधिकाऱ्यांवर वा वरिष्ठ अभियंत्यांवर झालेला नाही.

कोपरखैरणेतील भारनियमनग्रस्त भागांत पुरविण्यात आलेले जनित्र आणि अन्य साहित्य दुय्यम दर्जाचे असल्याची चर्चा मध्यंतरी रंगली होती. काही अधिकारी दबक्या आवाजात तशी चर्चा करीत असतात. येत्या काळात वीजपुरवठय़ाशी निगडित साहित्याचा दर्जा न सुधारल्यास ही स्थिती कायम राहील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या महिन्यात या भागातील ट्रान्सफॉर्मर जळाला होता. त्यानंतर कोपरखैरणेतील बऱ्याच सेक्टरमधील वीजपुरवठा सहा ते तास खंडित झाला होता. बुधवारीही या भागातील दोन ट्रान्सफॉर्मर जळाले. त्यामुळे दुपारी तीनच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला. तो पुन्हा सुरळीत होण्यासाठी मध्यरात्री एक वाजला होता. सायंकाळी सात वाजता अनेकदा विद्युतपुरवठा सुरू होऊन पुन्हा लगेच खंडित होत होता. याबाबत अभियंत्याकडे विचारणा केली असता निकृष्ट दर्जाच्या साहित्यामुळे अतिरिक्त भार आल्याने वीजयंत्रणा बंद पडत असल्याचे सांगण्यात आले.

दोन ट्रान्सफॉर्मर जळाल्याने विद्युतपुरवठा खंडित झाला होता. दोन्हीही ट्रान्सफॉर्मर आता बदलण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काळात ही समस्या जाणवणार नाही.

-स्वप्नाली कांबळे, कनिष्ठ अभियंता

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2018 3:59 am

Web Title: power supply breaks again koparkhairane
Next Stories
1 सिडकोच्या घरांसाठीची आज अंतिम यादी
2 अवकाळी पावसाचा फळांना फटका
3 गावठाण सर्वेक्षण मुद्दा ऐरणीवर
Just Now!
X