प्रगती वाचनालय, उरण

उरण नगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या मोरा गाव परिसरातील कष्टकरी कामगारांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांना विविध विषयांचे ज्ञान मिळावे या उद्देशाने १९८० मध्ये येथील ग्राइंडवेल नॉर्टन व स्कॉल ब्रुवरीज या दोन कंपन्यांतील कामगारांच्या निधीतून प्रगती वाचनालय सुरू करण्यात आले. लोखंडी पत्र्याची तात्पुरती शेड उभारून सुरू करण्यात आलेल्या या वाचनालयाची वाटचाल आता चाळिशीच्या दिशेने सुरू झाली आहे. अनेक आर्थिक संकटांवर मात करीत सुरू करण्यात आलेल्या या वाचनालयाला १९९३ साली महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने, तसेच जिल्हा ग्रंथालय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

उरणमधील मोरा परिसरात कोळी समाज व कामगारांची मोठी वस्ती आहे. या भागातील झोपडपट्टीत कामगार व कष्टकरी राहतात. त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी दत्ता कडू यांनी या वाचनालयाची कल्पना मांडली. त्यांच्यानंतर त्यांचे सहकारी चंद्रकांत सखाराम कोळी अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. तर जयेंद्र रामा कोळी व प्रकाश सखाराम कोळी हे या वाचनालयाची देखभाल करतात. उरण ते मोरा या मार्गावरच असलेल्या या वाचनालयात सध्या १० हजारांपेक्षा अधिक ग्रंथ, विविध विषयांवरील पुस्तके तसेच इतर साहित्यसंपदा आहे. तर १४ दैनिके, सात साप्ताहिके, १५ मासिके, २ पाक्षिके व ५० नियतकालिके वाचनालयात नियमितपणे उपलब्ध असतात. रोज सुमारे २७५ वाचक वाचनालयात येतात. यात १२०० कादंबऱ्या, ११०० कथासंग्रह, ८०० चरित्र, ८०० कविता-नाटके, ६०० धार्मिक पुस्तके, १४०० बाल साहित्यविषयक पुस्तके, राजकीय, विज्ञान, आरोग्यविषयक मुबलक पुस्तके उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणत्याही वयोगटातील, कोणत्याही स्वरूपाच्या पुस्तकांची आवड असलेल्या व्यक्तींना येथे त्यांना हवी ती पुस्तके सहज उपलब्ध होतात.

प्रगती वाचनालयाच्या सुरुवातीच्या काळात अनेक कामगारांनी १०० रुपयांपासून ते ५ हजार रुपयांपर्यंतची देणगी रूपात मदत केली आहे. उत्तम सेवा आणि मुबलक साहित्य भांडार या जोरावर वाचनालयाने क वर्गातून ब वर्गापर्यंत मजल मारली आहे. ब दर्जा मिळाल्यामुळे वाचनालयाला सध्या ६४ हजार रुपयांचे वार्षिक अनुदान मिळत आहे. त्यातून वाचनालयाचे अनेक खर्च भागवले जातात.

सुरुवातीच्या काळात वाचनालयाला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. परिसरातील रहिवाशांना शिक्षणाचे महत्त्व नीटसे समजले नव्हते. त्यामुळे वाचन ही तर त्यांच्यासाठी दूरचीच गोष्ट होती. तरीही या गोरगरीब वस्तीत वाचनाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न वाचनालयातील कर्मचाऱ्यांनी सुरूच ठेवला. आजही त्यांचे हे प्रयत्न सुरू आहेत. आर्थिक समस्यांवर मात करत वाचनालय सुरू ठेवण्याचा, त्याचा विकास करण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे. प्रसंगी वाचनालयासाठी उसने पैसे घेऊन नंतर शासकीय अनुदानातून त्याची परतफेड केली जात असल्याची माहिती चालकांनी दिली. दिवसभर काबाडकष्ट करून परतल्यानंतर अनेकांची पावले या वाचनालयाकडे वळतात. येथील शाळांतील विद्यार्थ्यांनाही वाचनालयाच्या विविध उपक्रमांत सहभागी करून घेतले जाते. रायगड जिल्ह्य़ातील कष्टकरी व कामगारांसाठी चालविण्यात येणाऱ्या या वाचनालयाची वाटचाल सध्या चाळिशीकडे सुरू आहे. सध्या या वाचनालयाला ब वर्गचा दर्जा मिळाला आहे. वाचनालयात वर्षभरात विविध उपक्रम राबवले जातात.

झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांना लाभ

याच परिसरात नगरपालिका विभागातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. तेथील विद्यार्थ्यांच्या घरी अभ्यासासाठी जागा, शांतता किंवा अनुकूल वातावरण नाही. त्यांच्यासाठी वाचनालयात खास व्यवस्था करण्यात आली आहे. याचा फायदा या भागातील झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांना होत आहे.

जगदीश तांडेल jagdishtandel25@gmail.com