18 November 2017

News Flash

कुटुंबसंकुल : देणाऱ्याचे हात..

सामाजिक योगदानाबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी संकुल प्रयत्नशील आहे.

पूनम धनावडे | Updated: September 12, 2017 2:54 AM

प्रजापती पार्क सोसायटी, कोपरखैरणे सेक्टर ११

प्रजापती पार्क सोसायटी, कोपरखैरणे सेक्टर ११

निवासी संकुलात अधिकाधिक सोयीसुविधा निर्माण करून रहिवाशांचे आयुष्य सुकर करण्याचा प्रयत्न अनेक ठिकाणी होतो. पण आपले आयुष्य सुकर करतानाच वंचितांच्या आयुष्यातही आनंदाची पखरण करण्याचा वसा कोपरखैरणे येथील प्रजापती पार्क सोसायटीने घेतला आहे.

नवी मुंबईतील असंख्य निवासी संकुलांपैकी एक आहे कोपरखैरणे सेक्टर ११ येथील प्रजापती पार्क. २००५मध्ये स्थापन झालेल्या या संकुलाने अनेक पर्यावरणस्नेही आणि समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत. संकुलात ८९ सदनिका आहेत. या सर्व सदनिकांतील रहिवासी सामाजिक उपक्रमांसाठी आपापल्या क्षमतेनुसार आर्थिक मदत करतात. चार वर्षांपूर्वी त्यांनी असे उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. अनेक सोसायटय़ा असे उपक्रम राबवण्यास सुरुवात करतात, मात्र त्यात आरंभशूरवृत्तीच अधिक दिसते. पण प्रजापती पार्कने असे होऊ दिले नाही. गेल्या चार वर्षांत त्यांनी समाजकार्यात खंड पडू दिलेला नाही.

संकुलातील रहिवासी दरवर्षी विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून गरजूंना आवश्यक वस्तू अथवा देणगी देतात. गरजू विद्यार्थ्यांना वह्य़ा, पुस्तके व अन्य शालोपयोगी वस्तूंचे वाटप केले जाते. इतर गरजू व्यक्तींना जीवनावश्यक वस्तू म्हणजेच कपडे, धान्य दिले जाते, असे तेथील रहिवाशांनी सांगितले. विविध नैसर्गिक आपत्तींचा फटका बसलेल्या व्यक्तींनाही मदत केली जाते. त्यांच्यासाठी खाद्यपदार्थ आणि कपडे पाठविले जातात.

सामाजिक योगदानाबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी संकुल प्रयत्नशील आहे. वेळोवेळी वृक्षारोपण करून संकुलात निसर्गरम्य वातावरण निर्माण करण्यात आले आहे. संकुलातील रहिवाशांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी व्यायामशाळा आहे. संकुलाच्या देखभालीची आणि संकुलाशी संबंधित शासकीय कामे योग्य वेळी पार पडावीत आणि कोणावरही त्याचा अतिरिक्त भार पडू नये यासाठी सदस्यांनी वेगवेगळी कामे वाटून घेतली आहेत. आरोग्य, स्वच्छता, सामाजिक कार्यात मदत, सांस्कृतिक कार्यक्रम यांची जबाबदारी विविध सदस्यांनी घेतली आहे.

संकुलातील सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांची जबाबदारी महिलांवर सोपविण्यात आली आहे. ‘प्रजापती पार्क सांस्कृतिक कार्यक्रम संघ’ तयार करण्यात आला आहे. या संघाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम उत्साहात साजरे केले जातात. येथे मनोरंजनाकरिता टेबल टेनिस, लॉन टेनिस, जिम इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. वाहनांच्या पार्किंगचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. रहिवाशांच्या वाहनांच्या पार्किंगची जागा निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक रहिवासी त्याच्या ठरलेल्या जागेवरच वाहने उभी करतो. दुचाकीसाठी वेगळी पार्किंग व्यवस्था आहे. तसेच भविष्यात घरागणिक प्रत्येकी दोन चारचाकी वाहन पार्क करण्याची सुविधा उपलब्ध आहे, असेही येथील सदस्यांनी सांगितले.

पर्यावरणपूरक उपक्रम

संकुलातील हवा शुद्ध राहावी म्हणून अनेक झाडे लावण्यात आली आहेत. नियमितपणे त्यांची काळजी घेतली जाते. ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करून जैविक खतनिर्मिती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर करण्याची तयारी सुरू आहे. तसेच पर्जनजल संधारणाचेही नियोजन सुरू आहे.

First Published on September 12, 2017 2:54 am

Web Title: prajapati park housing society in kopar khairane