पनवेलच्या प्रणीत पाटीलचा मंगळ संशोधन मोहिमेत समावेश

सीमा भोईर, पनवेल</strong>

अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’च्या मंगळ मोहिमेसाठी नुकत्याच झालेल्या संशोधन मोहिमेत मूळचा अलिबागचा रहिवासी आणि पनवेलमध्ये प्राथमिक- माध्यमिक शिक्षण घेतलेल्या प्रणीत पाटील याने कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी पार पडली. लहानपणी थेट पहिलीत प्रवेश घेतल्याने फारसे मित्र मिळाले नाहीत.‘ढ’ विद्यार्थ्यांमध्ये गणला गेला. मात्र तेव्हापासून ग्रह, ताऱ्यांची मैत्री झाली आणि ‘नासा’पर्यंत जाऊन पोहोचल्याचे प्रणीतने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

प्रणीत पाटीलच्या या यशाने देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. मंगळ ग्रहाचे संशोधन करण्याची संधी प्रणीतला अमेरिकेतील ‘नासा’ संस्थेने दिली आहे. डॉ. जॉन सेपनियक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रणीत संशोधन करणार असल्याचे तो म्हणाला.

प्रणीत मूळचा अलिबागचा. मात्र वडील पोलीस खात्यात असल्याने सातत्याने त्यांची बदली होत होती. प्रणीत जन्माला आल्यापासून वर्ष-दोन वर्षांत त्याच्या वडिलांच्या अलिबाग, मुरूड आणि पनवेल येथे बदल्या झाल्या. त्यामुळे शिशुवर्गात न जाता थेट पनवेल येथील व्ही.के.हायस्कूलमधील पहिल्या वर्गात रवानगी झाली. साहजिकच मला अक्षर ओळखही नव्हती. त्यामुळे ‘ढ’विद्यार्थी अशी गणना होऊ लागली. वर्गातील इतर मुले  माझ्याशी मैत्री करणे टाळू लागले. मित्र नसल्याने  आकाशातील ग्रह, तारे, चंद्र, सूर्य यांची ओढ लागली. इमारतीच्या गच्चीतून  तासन्तास आकाशाकडे टक लावून पाहायचो. ‘खूप अभ्यास केल्यानंतरच तिथपर्यंत पोहोचता येते’, असे एकदा आई म्हणाली. त्यानंतर अभ्यासाकडे लक्ष देऊ लागलो. चौथीत असल्यापासून मग कधीच पहिला क्रमांक सोडला नाही.    कामोठय़ातील एम. जी. एम. महाविद्यालयात शिकत असताना तेथील प्रा. राजेंद्र पाटील यांच्या प्रेरणेने २०१० पासून प्रणीतचा ‘नासा’चा प्रवास सुरूझाल्याचे त्याने सांगितले. ‘नासा’च्या संशोधन केंद्रात एखाद्या ग्रहावर असते, तशा एकाकी आणि अत्यल्प साधनांच्या आधारे त्यांना राहावे लागत होते. त्या संशोधन केंद्रात मंगळावरील माती आणि वातावरण कृत्रिम पद्धतीने तयार करून त्यात काय काय रुजेल, हे आजमावून पाहिले. त्याचे आश्चर्यकारक परिणाम दिसून आले. मंगळावर राहण्याचा सराव व्हावा म्हणून  त्यासाठी खास तयार केलेल्या वातावरणात १२ दिवस ठेवण्यात आल्याचे प्रणितने सांगितले.

असा घडला ‘नासा’पर्यंतचा प्रवास

प्रणीत पाटीलचे  शिक्षण पनवेलच्या व्ही. के. हायस्कूलमध्ये मराठी माध्यमातून झाले. एमएजीएम कॉलेजमधून त्याने सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग केले. मुंबईत घाटकोपर येथील एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करीत असताना अमेरिकेतील ‘अमेरिकन अलायन्झ’ या कंपनीत आयटी स्पेशालिस्ट म्हणून काम करण्याची संधी त्याला मिळाली.

ही कंपनी ‘नासा एन्सापयर’ सिस्टिममध्ये सिलिका पुरविण्याचे काम करते. पुढे अमेरिकेतील ‘एम्री रिडल एरोनॉटिकल युनिव्हर्सिटी’ या अंतराळ संशोधनात अग्रस्थानी असलेल्या विद्यापीठात त्याने प्रवेश घेतला. २०१६ मध्ये ‘थ्री कन्टिन्युइंग एज्युकेशन युनिट इन सबऑर्बिटल मिशन सिम्युलेशन’ या विषयांत त्याने पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ‘नासा’च्या १६०२ या बॅचमध्ये ‘सायंटिस्ट अस्ट्रोनॉट’ या पदासाठी त्याची निवड झाली. मंगळ मोहिमेच्या संशोधनात दोनशे जणांच्या पथकाचा कार्यकारी अधिकारी म्हणून त्याची निवड करण्यात आली. त्याने यशस्वीपणे मोहीम पूर्ण केली.