प्रशांत ननावरे

काही गोष्टी आपल्याला स्वप्नवत वाटत असतात. जो पदार्थ आवडतो तोच पदार्थ जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी दिसत असतो. आज आपण ज्या पदार्थाविषयी जाणून घेणार आहोत हा तसाच काहीसा प्रकार आहे. पण इथे केवळ हे स्वप्नरंजन नसून प्रत्यक्षात घडलेलं आहे आणि आता त्यासाठी फार लांब जायची आवश्यकता नसून तुमच्या शहराच्या वेशीवर हा प्रकार आलाय.

देशभरातून खवय्ये राजधानी दिल्लीत पोहोचले की जुन्या दिल्लीच्या चावरी बाझार येथील शतकी परंपरा लाभलेल्या कुरेमल मोहनलाल कुल्फीवाले यांच्याकडे आवर्जून जातात. त्या भेटीमागचं कारण म्हणजे कुरेमल यांच्याकडे मिळणारी फळांमध्ये स्टफ केलेलं आइस्क्रीम आणि कुल्फी. आपल्या व्यवसायानिमित्त फिरतीवर असणारे नवी मुंबईचे हॉटेल व्यावसायिक सनप्रीत सिंगसुद्धा काही महिन्यांपूर्वी असेच कुरेमल यांच्याकडे दाखल झाले आणि या जगावेगळ्या प्रकाराच्या प्रेमात पडले. नवी मुंबईत परत येऊन त्यांनी दिल्लीला जे पाहिलं होतं त्याच्या पलीकडे जाऊन आणखीन काही नवीन प्रयोग केले. तीन-चार महिन्यांच्या संशोधनानंतर त्यांनी अलीकडेच आपला स्वत:चा ‘हीम क्रीम-द गॉर्मेट कुल्फी’ हा ब्रॅण्ड सुरू केला.

बहुतेक ठिकाणी आपल्याला आइस्क्रीम हे कोन, कप किंवा कॅण्डीच्याच स्वरूपात मिळतं. मग त्यामध्ये प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार फ्लेवर्सची निवड करतो. अलीकडे बाजारात दाखल झालेल्या देशी-परदेशी ब्रॅण्डमुळे खवय्ये बदाम, पिस्ता, मलई या काही नेहमीच्या फ्लेवर्सच्या व्यतिरिक्त चॉकलेट आणि फळांपासून तयार केलेल्या फ्लेवर्सला पसंती देऊ  लागले आहेत. पण ‘हीम क्रीम’ हा पूर्णपणे वेगळाच मामला आहे. इथे तुम्हाला विविध ताज्या फळांचा आतील गर काढून त्यामध्ये त्याच फ्लेवर्सचं किंवा वेगळ्या फ्लेवर्सचं आइस्क्रीम स्टफ केलेलं पाहायला मिळतं. तुम्हाला आठवत असेल काही आइस्क्रीम कंपन्यांनी फळांसारखी दिसणारी प्लास्टिकची आवरणं तयार केली होती. पण बाहय़ आवरणाशिवाय आतील आइस्क्रीमच्या चवीत काहीच वेगळेपण नव्हतं.

दिल्लीतील कुरेमल यांच्याकडे काही मोजकीच फळं मिळत असली तरी ‘हीम क्रीम’मध्ये तोतापुरी आंबा, ड्रॅगन फ्रुट, मोसंबी, डाळिंब, सफरचंद, पेरू, संत्रा, वांग (फळभाजी) अशा आठ वेगवेगळ्या प्रकारची आइस्क्रीम स्टफ केलेली फळं मिळतात. या प्रत्येक फळामध्ये त्या फळाचा गर आणि रबडी यांच्या मिश्रणातून तयार केलेलं आइस्क्रीम स्टफ केलेलं असतं.

हा अनोखा प्रकार तयार करताना सर्वप्रथम फळांच्या अंतरंगात भरलं जाणारं आइस्क्रीम तयार करून घेतलं जातं. त्यासाठी प्रत्येक फळाचा गर काढून घेतला जातो. सोबतच रबडीही तयार होत असते. रबडीत साखरेचं प्रमाण किती असावं यावर त्याची गोडी, चव आणि आयुष्य ठरतं. त्यामुळे ते सर्वात कौशल्यपूर्ण काम आहे. रबडी तयार झाली की त्यामध्ये फळाचा गर मिक्स केला जातो. त्याची एक वेगळी प्रक्रिया आहे. जे त्या आइस्क्रीमचा पोत आणि चवीला अंतिम रूप देण्यास मदत करतं. त्यानंतर ते मिश्रण स्कूप केलेल्या फळामध्ये भरलं जातं आणि फळाचं तोंड प्लास्टिकच्या झाकणाने बंद करून डीप फ्रिजमध्ये ती फळं ठेवली जातात.

अतिशय निम्न तापमानाला साधारणपणे तीन-चार तासांत हा प्रकार खाण्यासाठी सज्ज होतो. मुख्य म्हणजे ही आइस्क्रीम फळं फार काळ तयार करून ठेवली जात नाहीत. तर दररोज गरजेप्रमाणे बनवली जातात. त्यामुळे फळाचा ताजेपणा तर टिकून राहतो, सोबतच आइस्क्रीमही बर्फासारखं बेचव होत नाही. ऑर्डर आल्यावर फळावरील झाकण काढून मोठय़ा धारधार सुरीने फळाचे सहा ते आठ काप केले जातात आणि ते खाण्यासाठी सव्‍‌र्ह केलं जातं. बाहेरून फळ आणि आतमध्ये आइस्क्रीम असे फळाचे काप पाहताना गंमत वाटते. आइस्क्रीममध्ये फळांचा गर असल्याने फळाची चव तर लागतेच पण फळामध्येच आइस्क्रीम स्टफ केल्याने त्या फळाचा सुगंधही आइस्क्रीम धारण करतं. त्यामुळे त्या फोडी खाताना फळ आणि आइस्क्रीम अशा दोन्ही गोष्टी एकत्रित खाण्याची मजा लुटता येते.

या स्टफ आइस्क्रीमसोबतच इथे तब्बल कुल्फीचे एकवीस प्रकार आहेत. चोको क्रीम, रोस्टेड आलमंड, गुलकंद, अंजीर, ओरिओ क्रीम, पारले जी, टेंडर कोकोनट, रबडी, थंडाई, मिठा पान, आम पन्ना, इमली मसाला, लिची, पॅरोट साँग, काला खट्टा, शाही गुलाब, चिकू, मँगो डिलाइट, डाळिंब, बेरी बंच असे एकाहून एक सरस आणि क्वचितच ऐकलेले फ्लेवर्स एकाच ठिकाणी मिळत असल्याने आइस्क्रीम प्रेमींची चांगलीच चंगळ झालेली आहे. कुल्फीच्या किमती सत्तर रुपये आणि आइस्क्रीम स्टफ फळं अडीचशेच्या घरात आहेत. आजवर फळांचं आइस्क्रीम हा प्रकार माहीत होता. पण खऱ्याखुऱ्या फळाच्या आतमध्ये आइस्क्रीम ही संकल्पना सर्वासाठीच नवीन आहे. त्यामुळे ही गारेगार फळं नक्कीच चाखून पाहायला हवीत.

हीम क्रीम-द गॉर्मेट कुल्फी

* कुठे? – शॉप नं. ५२, प्लॉट ७३, वेल्फेअर चेंबर्स, फेडरल बँकसमोर, सेक्टर १७, वाशी, नवी मुंबई</p>

* कधी? – सोमवार ते रविवार दुपारी १२ ते रात्री ११ वाजेपर्यंत.

nanawareprashant@gmail.com

@nprashant