19 October 2019

News Flash

नालेसफाईच्या कामाचे आदेश २५ मेपर्यंत मान्सूनपूर्व कामे

शहरातील साफसफाई कंत्राटातच पावसाळी गटारे सफाईची कामे देण्यात आली आहेत.

नवी मुंबई : लोकसभा निवडणूक आचरसंहितेमुळे यावर्षी मान्सूनपूर्व कामे रखडण्याची शक्यता असताना पालिका आयुक्तांनी मोठे पावसाळी नाले व गटारे साफसफाईच्या कामांसाठी निवडणूक आयोगाकडून मान्यता घेत या कामांना गती दिली आहे. १५ मे पर्यंत पावसाळी गटारे साफसफाई पूर्ण करण्यात येणार असून मोठे पावसाळी नाले सफाईचे कंत्राटदारांना मंगळवारी कार्यादेश दिले आहेत. २५ मेपर्यंत ही सर्व कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.

सध्या ही कामे गतीने सुरू आहेत. मात्र गटारामधून निघालेला मल हा जाड पॉलिथिन किंवा सिमेंटच्या गोण्यांवर टाकण्याकडे संबंधित ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.

शहरातील साफसफाई कंत्राटातच पावसाळी गटारे सफाईची कामे देण्यात आली आहेत. तर शहरातील मोठे नाले सफाईसाठी यापूर्वी २२ जणांना कार्यादेश देण्यात आले होते. उर्वरित कामांचे कार्यादेशही आज देण्यात आले आहेत. शहरात सुमारे ४०० किमी लांबीची पावसाळी गटारे असून ९१ साफसफाई ठेकेदारांमार्फत गाळ काढण्यात येत आहे. तर मोठे नाले हे ९० किमी असून त्यांची साफसफाई वेगाने सुरू करण्यात आली आहे.

साफसफाईनंतर बाहेर काढून ठेवण्यात येणारा गाळ १ ते २ दिवसात सुकल्यानंतर लगेच उचलावा व काढलेला गाळ जाड पॉलिथिन किंवा सिमेंटच्या गोण्यांवर काढून ठेवावा, असे निर्देश असताना हा गाळ रस्त्यावर व फूटपाथवरच खाली टाकण्यात आल्याचे काही ठिकाणी दिसत आहे.

पावसाळी गटारांची कामे १५ मे पर्यंत पूर्ण करण्यात येतील. तर मोठय़ा नाल्यांच्या सफाईसह सर्वच मान्सूनपूर्व कामे २५ मे पर्यंत पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.  गाळ जाड पॉलिथिन किंवा रिकाम्या गोण्यांवर टाकला नसल्यास पाहणी करून कार्यवाही करण्यात येईल.

-तुषार पवार, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन

First Published on May 8, 2019 4:25 am

Web Title: pre monsoon work of drain cleaning till may 25