नवी मुंबई महापालिका प्रशासनाचे नियोजन; दहापैकी पाच प्रकल्पांची कार्यवाही सुरू

नवी मुंबई : तिसऱ्या लाटेपूर्वी १०० मेट्रिक टन प्राणवायू निर्मितीची घोषणा पालिका प्रशासनाने केली होती, मात्र ठेकेदाराला प्राणवायू खरेदीची हमी हवी असल्याने हा प्रकल्प सध्या बरगळला आहे. त्यामुळे प्रशासनाने हवेतील प्राणवायू संकलित करणारे दहा प्रकल्प रुग्णालयांत उभारण्याचे ठरविले आहे. यातील पाच प्रकल्पांची कार्यवाही सुरू केली आहे.

करोना रुग्णासाठी प्राणवायू ही मोठी गरज असून करोनाच्या दुसऱ्या लाटेत प्राणवायू तुटवडा निर्माण झाल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. त्यात करोनाची तिसरी लाट ही मोठी असण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने या काळात प्राणवायूची खूप मोठी गरज भासणार आहे. दुसऱ्या लाटेत शहराला २० मेट्रिक टन प्राणवायूची गरज होती. मात्र तीही भागविताना प्रशासनाची मोठी अडचण झाली होती. त्यामुळे पालिका प्रशासनाने पीपीपी तत्त्वावर १०० मेट्रिक टन प्राणवायू निर्मिती प्रकल्पाची घोषणा केली होती. यातील ५० मेट्रिक टन प्राणवायू पालिका शहरासाठी वापरणार होती तर ठेकेदाराला ५० मेट्रिक टन प्राणवायू इतरांना विकण्याची परवानागी देण्यात येणार होती. मात्र प्रकल्प खर्च व ठेकेदाराला आवश्यक असलेली प्राणवायू खरेदीची हमी यामुळे हा प्रकल्प अद्याप कागदावरच राहिला आहे.

त्यात दुसऱ्या लाटेनंतर स्थिर झालेली रुग्णसंख्या आता वाढत आहे. ही रुग्णवाढ कायम राहिली तर तिसऱ्या लाटेचे शहरासाठी संकट असल्याचा धोका पालिका प्रशासनाने वर्तवला आहे. या लाटेत दुसऱ्या लाटेपेक्षा मोठी रुग्णसंख्या राहणार असून प्राणवायूची गरज भासणार आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने आता हवेतील प्राणवायू वेगळा करून तो संकलित करणारे सरासरी दोन मेट्रिक टन निर्मितीचे दहा प्राणवायू प्रकल्प उभारण्यावर भर दिला आहे. प्रत्येकी सरासरी २ कोटी खर्चाचे हे प्रकल्प असून त्यातून १८ ते २० टन प्राणवायू निर्मिती होणार आहे. हे प्रकल्प वाशी सिडको प्रदर्शनी केंद्र, वाशी सार्वजनिक रुग्णालय, त्याचप्रमाणे नेरुळ, ऐरोली, तुर्भे, बेलापूर येथील रुग्णालय येथे उभारण्यात येणार आहेत. त्यातील ५ प्रकल्प तत्काळ निर्मितीसाठी पालिकेने काही प्रकल्पांना कार्यादेश दिले आहेत. पहिल्या ५ प्रकल्पातील दोन प्रकल्पांना बेलापूर तसेच ऐरोली मतदारसंघाचे आमदार यांनी त्याच्या फंडातून प्रत्येकी १ कोटीचा निधी दिला आहे. तर एका प्रकल्पासाठी सामाजिक दायित्व फंडाची मदत मिळाली आहे. त्यामुळे जुलै महिन्याच्या अखेरीस यातील काही प्रकल्प प्रत्यक्षात येतील असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. आगामी काही दिवसांत ही कामे वेगात होणार असल्याची माहिती पालिका उपायुक्त बाबासाहेब राजळे यांनी दिली.

शहराची गरज भागणार

दुसऱ्या लाटेत  प्राणवायूची  २० मेट्रिक टनापर्यंत गरज होती. तेवढी प्राणवायू निर्मिती करण्याचे पालिकेचे लक्ष्य आहे. तिसरी लाट किती मोठी असेल यावर  प्राणवायूची गरज असणार आहे.

शहरात साधारणत: १.८ ते २ मेट्रिक टन प्राणवायूसाठी  १० प्राणवायू निर्मिती प्रकल्प निर्माण करण्यात येणार आहेत. त्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे पालिकेकडे १८ ते २० मेट्रिक टन प्राणवायू निर्मिती होऊन शहराला दिलासा मिळेल. तसेच १०० मेट्रिक टन निर्मितीच्या ‘एलएमओ’ प्रकल्पाबाबत सखोल विचारांती निर्णय घेतला जाणार आहे. -अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका