16 January 2021

News Flash

खाडीकिनारा सुरक्षेला प्राधान्य

सीसीटीव्हींच्या निविदेसाठी १२० कंत्राटदारांचा प्रतिसाद

(संग्रहित छायाचित्र)

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने शहरात एक हजार सीसीटीव्ही बसविण्यासाठी काढलेल्या निविदेसाठी १२० कंत्राटदारांनी रस दाखविला असून त्यांच्यासाठी लवकरच शुध्दीपत्रक प्रसिद्ध केले जाणार आहे. एका निविदेसाठी प्रथमच मोठय़ा प्रमाणात कंत्राटदार स्पर्धेत उतरले आहेत. या प्रकल्पात खाडीकिनाऱ्याची सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्यात येणार असून नऊ थर्मल सीसीटीव्ही कॅमेरे केवळ खाडीकिनाऱ्यांवर लावले जाणार आहेत.

मुंबईप्रमाणेच नवी मुंबईला विस्र्तीण असा खाडीकिनारा लाभला आहे. बारा वर्षांपूर्वी समुद्र मार्गे मुंबईत प्रवेश करून दहशतवाद्यांनी मुंबईत हाहाकार माजवला होता. तेव्हापासून समुद्र व खाडीकिनाऱ्यांवरील सुरक्षा अधिक सक्रिय करण्यात आली आहे. नवी मुबंई पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत दिवा ते दिवाळा आणि दिवाळे ते जेएनपीटीपर्यंत साठ ते सत्तर किलोमीटरचा समुद्र व खाडीकिनारा आहे. या खाडीकिनाऱ्यावर गस्त घालण्यासाठी नवी मुबंई पोलीस आयुक्तालयाला शासनाने दोन स्पीड बोट दिल्या आहेत. मध्यतंरी या स्पीड बोटची देखभाल, डिझेल आणि संचालन यावरून प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे या स्पीड बोट काही काळ विश्रांती घेत होत्या. नवी मुबंई, उरणच्या खाडीकिनारी अनेक शासकीय प्रकल्प आहेत. त्यांची सुरक्षितता हा एक मोठा प्रश्न असून नवी मुंबई पोलिसांच्या शिरावर पूर्वे बाजूकडील सुरक्षा आहे. त्यासाठी नवी मुबंई पोलीस आयुक्तालयाने काही सागरी पोलीस ठाण्यांची स्थापना देखील केली आहे. नवी मुंबई पालिकेने पोलिसांना तपासात सहकार्य होईल असे सीसीटीव्ही कॅमेरे दहा वर्षांपूर्वी बसविले होते. शहराच्या मोक्याच्या ठिकाणी २६८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते, मात्र हे कॅमेरे आता देखभाल आणि आधुनिक तत्रज्ञानाअभावी शरपंजरी पडले आहेत. त्यांच्या जागी नव्याने एक हजार ४०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार असून पालिका या प्रकल्पावर १६० कोटी रुपये खर्च करीत आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली ही ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. सिडको, जेएनपीटी आणि पालिका खाडीकिनाऱ्यावरील सीसी टीव्ही कॅमऱ्यांसाठी आर्थिक सहकार्य करणार आहे. नवी मुंबई पालिकेने दिघा ते दिवाळ्यापर्यंतच्या पालिका हद्दीत नऊ थर्मल सीसीटीव्ही कॅमेरे केवळ खाडीकिनाऱ्यावर नजर ठेवण्यासाठी निश्चित केले आहेत.

शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निविदेला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला आहे. जानेवारीपर्यंत निविदेचे कार्यदेश देण्यात येतील. त्यानंतर आठ -नऊ महिन्यांत शहरात संपूर्ण अद्ययावत व आधुनिक असे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. यात खाडी व समुद्रकिनाऱ्याला अधिक महत्त्व देण्यात आले आहे.
-अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई पालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2020 2:29 am

Web Title: preference to safety the bay dd70
Next Stories
1 करोनाचा कहर : पनवेलमध्येही रुग्णवाढ कायम
2 करोना चाचण्यांसाठी प्रवाशांना विनवण्या करण्याची वेळ
3 फेरीवाल्यांना मोकळीक
Just Now!
X