25 February 2021

News Flash

आठशे खाटा राखीव

नवी मुंबईतील करोना पिरिस्थती दिवाळीपूर्वीपर्यंत कमी झाल्याने पालिका प्रशासनाने सुरू केलेली करोना काळजी केंद्रे बंद केली होती.

(संग्रहित छायाचित्र)

करोना काळजी केंद्र सुरू करण्याची तयारी; आठवडाभरात सातशे रुग्णांची वाढ

नवी मुंबई : आठवडाभरापूर्वीपर्यंत नियंत्रणात आलेल्या करोना विषाणूने ठाणे जिल्ह्यात वेगाने पसरायला सुरुवात केली आहे. गेल्या आठवडाभरात नवी मुंबईत सातशे करोना रुग्णांची वाढ झाली असून दिवसाला सरासरी शंभरपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. शहरातील उपचाराधिन रुग्णांची संख्याही १ हजाराच्या पुढे गेली आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंद केलेली काळजी केंद्र सुरू करण्याबरोबर औषधसाठा नियोजनाची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. आठशे खाटांची व्यवस्था राखीव ठेवण्यात येणार आहे.

रुग्णवाढ होत असल्याने पालिका प्रशासनाने निर्यातभवन व राधास्वामी सत्संग भवन येथील करोना केंद्र बंद करुन ती जागा संबंधित संस्थेला परत करण्याचा निर्णय घेतला होता. परंतू आता हा निर्णय तात्पुरता रद्द केला असून या दोन्ही जागा ताब्यात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेने येथील साफसफाईलाही सुरुवात केली आहे.

नवी मुंबईतील करोना पिरिस्थती दिवाळीपूर्वीपर्यंत कमी झाल्याने पालिका प्रशासनाने सुरू केलेली करोना काळजी केंद्रे बंद केली होती. सध्या शहरात एकमेव सिडको प्रदर्शनी केंद्र येथे व डॉ.डी वाय पाटील रुग्णालयात करोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काळजी केंद्रांसाठी घेतलेल्या जागाही परत करण्यात येत आहेत. निर्यातभवन  तसेच राधास्वामी सत्संग भवन संबंधित संस्थेला परत देण्याची प्रक्रियाही सुरू केली होती. मात्र आता या ठिकाणी पुन्हा काळजी केंद्र सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. येथील ८०० पेक्षा अधिक खाटांची व्यवस्था राखीव म्हणून सज्ज ठेवण्यात येणार आहे.

नवी मुंबई शहरात दररोजच्या नव्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे.  नव्या रुग्णांची संख्या ३७ पर्यंत कमी झाली होती ती आता शंभरपर्यंत वाढली आहे, तर  उपचाराधीन रुग्ण ७००च्या खाली आले होते. ते आता पुन्हा १००० पर्यंत गेले आहेत. करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ही ११००च्या पुढे गेली आहे.

नियमांचे पालन न झाल्यास कठोर कारवाई

शहरात पुन्हा करोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे नागरीकांनी खबरदारी घ्यावी. निर्यातभवन व राधास्वामी सत्संग भवनमध्ये गरज पडली तर सुविधा करण्यात येणार आहे. नागरीकांनी नियम न पाळल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2021 12:02 am

Web Title: preparing to start a corona care center akp 94
Next Stories
1 नवी मुंबईतील माजी नगरसेवकाची आत्महत्या
2 ‘एमआयडीसी’तील रस्त्यांचे कॉँक्रीटीकरण
3 करोना रुग्णांची शंभरी पार
Just Now!
X