पालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना

नवी मुंबई आठवडाभरापासून पडत असलेल्या पावसामुळे नवी मुंबईत साथीच्या आजारांचा ‘ताप’ वाढला आहे. विषाणुसंसर्गाचे प्रमाण वाढल्यामुळे पालिकेच्या तसेच खासगी रुग्णालयांत दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. त्यात पावसामुळे पाण्यात फिरणाऱ्या उंदरांच्या वावरामुळे ‘लेप्टो’चा ‘ताप’ वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेने खबरदारी म्हणून साफसफाई कामगारांसह इतर कामगारांना प्रतिबंधात्मक गोळ्यांचे वाटप करण्यास सुरुवात केल्याची माहिती पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

मागील आठ दिवसांपासून नवी मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात बदल झाला असल्याने वातावरण विषाणुसंसर्गासाठी पोषक ठरत असल्याने नवी मुंबईत सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले आहेत. वाशी येथील महापालिकेच्या रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात उपचारासाठी दररोज दोन ते अडीच हजार रुग्ण येत आहेत. ३०० खाटांची क्षमता असल्याने जमिनीवर गाद्या टाकून उपचार सुरू आहेत.

त्यात ओलीमुळे उंदरांचे प्रमाण वाढत असल्याने ‘लेप्टोस्पायरोसिस’ हा आजार बळावण्याची शक्यता असते. हा आजार उंदीर, डुक्कर यांच्या लघवीमुळे पाणी दूषित झाल्यामुळे ‘लेप्टो’चे विषाणू वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे पालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. खबरदारी म्हणून सव्‍‌र्हे करण्यात येत आहे. तर या कामगारांना लेप्टो होऊ  नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेच्या वतीने गोळ्यांचे वाटप करण्यात येत आहे.

‘लेप्टो’च्या आजारात तीव्र ताप, डोकेदुखी, थंडी व स्नायुदुखीचा त्रास होतो. नागरिकांनी कोणत्याही तापाबाबत घाबरून न जाता योग्य ते उपचार करावेत, असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले आहे.

उंदरांमुळे ‘लेप्टो’ आजाराबाबत पालिकेने खबरदारी घेतली आहे. सफाई कमागरांना ‘डॉक्सीसायक्लॉन’च्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. शहरात अद्याप रुग्ण सापडले नसून घरोघरी जात तपासणी व गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे.

– डॉ.उज्ज्वला ओतुरकर, विद्यकीय अधिकारी, नवी मुंबई महापालिका