रुग्णांची गैरसोय; पालिकेकडून डॉक्टरांना नोटीस

नवी मुंबई : शासनाने खासगी आरोग्य सेवा या काळात सुरू ठेवावी असे आदेश दिलेले असतानाही शहरातील बहुतांश खासगी दवाखाने बंद आहेत. यामुळे इतर आजारांसाठी रुग्णांची गैरसोय होत आहे. १२०० दवाखान्यांपैकी काही मोजकेच सुरू आहेत. यामुळे पालिका प्रशासनाने याची दखल घेतली असून संबंधित डॉक्टरांना नोटीस बजावण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, दवाखाने सुरू ठेवल्याने सामाजिक अंतर ठेवण्याच्या नियमाचा भंग होत असून यामुळे डॉक्टरांसह रुग्णांनाही धोका निर्माण होण्याची चिंता या डॉक्टरांना आहे.

नवी मुंबईत करोनामुळे एका फिलिपाइन्स नागरिकाचा, तर एका गोवंडी येथील महिलेचा पालिका रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत करोना संसर्ग होऊ नये यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे. शहरात झोपडपट्टय़ांचा विस्तारही मोठा आहे. महापालिकेकडे १२०० खासगी दवाखान्यांची (क्लिनिक) नोंद आहे. मात्र यातील बहुतांश दवाखाने हे सद्य:स्थितीत बंद आहे. एकीकडे शहरात संचारबंदी असल्याने प्रवासाची कोणतीही व्यवस्था नाही. त्यात जवळचे दवाखानेही बंद असल्याने रुग्णांना इतर आजारांसाठी उपचार मिळणे कठीण होत आहे. उपचारादरम्यान कोणतीही समस्या निर्माण होऊ  शकेल ही भीती या डॉक्टरांना आहे. त्यात मदतनीस कामावर येत नाहीत. त्यामुळे दवाखाने कसे सुरू करायचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

राज्य शासन व पालिकेने या खासगी डॉक्टरांना सेवा सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असे सतानाही ते सुरू होत नसल्याने पालिकेने आता त्यांना नोटीस बजावण्याची तयारी केली आहे.

या गंभीर परिस्थितीत समाजिक अंतर ठेवून रुग्णांवर उपचार करणे गरजेचे आहे. आंम्ही आरोग्यसेवा देत आहोत, इतरांनीही ती सुरू ठेवावी असे आवाहन नेरुळ येथील डॉक्टर महेश पडसलगे यांनी केले आहे. तर आमचे दवाखाने हे छोटय़ा जागेत आहेत. त्यामुळे सामाजिक अंतर कसे ठेवायचे हा आमच्यासमोर प्रश्न आहे. त्यामुळे सेवा बंद आहे. मात्र हिम्पाम या डॉक्टर संघटनेच्यावतीने मोबाईलद्वारे ऑनलाईन सेवा आंम्ही देत आहोत, असे या संघटनेचे अध्यक्ष डॉ.प्रतिक तांबे यांनी सांगितले.

औषधांची दुकाने सुरू

शहरात करोनाबरोबरच इतरही रुग्णसंख्या भरपूर आहे. आम्हाला औषधे पुरवण्यात अडचणी येत आहेत, परंतु कंपन्यांनी औषध पुरवठा वेळेवर केल्यास औषधांची दुकाने आता नियमितपणे सुरू राहतील. आता शहरातील सर्व दुकाने सुरू असल्याचे केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी राजू जाधव यांनी सांगितले.

या परिस्थितीत शहरातील खासगी दवाखाने सुरू ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. तरीही शहरातील काही दवाखाने बंद असतील तर संबंधित डॉक्टरांनी कर्तव्य समजून सेवा सुरू करावी, अन्यथा त्यांना नोटीस बजावण्यात येईल.

-आण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

नवी मुंबईत काही ठिकाणी खासगी दवाखाने सुरू आहेत, परंतु करोनाचा संसर्गाचा संभाव्य धोका असल्याने डॉक्टरांना पीपीई किट देण्याची मागणी केली आहे. डॉक्टरांना ही सेवा द्यायची आहे, परंतु अनेक अडचणीही येत आहेत.

  -डॉ.अरुण कुऱ्हे, अध्यक्ष,नवी मुंबई डॉक्टर फाऊंडेशन