महापालिकेच्या केंद्रांवर २१५ जणांना लस; ११ केंद्रांचे नियोजन; ४४ जणांना पालिकेकडून प्रशिक्षण

लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : महापालिका केंद्रांवर लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला असला तरी खासगी रुग्णालयांमध्ये अंमलबजावणीतील गोंधळामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारीही लसीकरण सुरू होऊ शकले नाही. महापालिका प्रशासनाने ४४ जणांना मंगळवारी प्रशिक्षण दिले असून दोन दिवसांत येथील लसीकरण सुरळीत होईल, असा दावा केला आहे. तर पालिका केंद्रांवर २१५ जणांना लस देण्यात आली.

करोना लसीकरणाचा दुसरा टप्पा १ मार्चपासून केंद्र शासनाने सुरू केला आहे. या टप्प्यात शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षात अंमलबजावणीतील गोंधळ आणि संभ्रमामुळे मंगळवारीही नवी मुंबईत अनेकांच्या पदरी निराशा पडली होती. कोविन-२ या संकेतस्थळावर नावनोंदणी करताना अडचणी येत असल्याने अनेकांना लस घेणे शक्य झाले नव्हते. मंगळवारी मात्र महापालिका केंद्रांवर २१५ जणांना लस देण्यात आली असून खासगी रुग्णालयांत लसीकरणासाठी पालिका प्रशासनाने नियोजन केले आहे. खासगी रुग्णालयांतील आरोग्यकर्मीना मंगळवारी पालिकेच्या वतीने प्रशिक्षण देण्यात आले असून पालिकेच्या नेरुळ, वाशी, ऐरोली रुग्णालयांबरोबरच शहरातील ११ खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण करण्यात येणार आहे. निवड करण्यात आलेल्या प्रत्येक रुग्णालयातील ४ अशा एकूण ४४ जणांना लसीकरणाबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले असल्याचे महापालिकेच्या अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण यांनी सांगितले.  मंगळवारी पालिकेच्या नेरुळ येथील रुग्णालयात अनेक ज्येष्ठ नागरिकांनी गर्दी केली होती. रुग्णालयात टोकन देऊन लसीकरणाची प्रक्रिया राबवण्यात येत असल्याचे पाहायला मिळाले. तर अनेक ज्येष्ठ नागरिक लसीकरण प्रक्रियेबाबत विचारणा करण्यासाठी आले होते. कोविन अ‍ॅपवर नोंद झाली आहे, परंतु कोणत्या ठिकाणी लस घ्यायची ही माहिती मिळाली नाही. त्यामुळे चौकशीसाठी आल्याचे वाशी येथील ज्येष्ठ नागरिक दिनकर केळकर यांनी सांगितले.

महापालिकेच्या वाशी, नेरुळ, ऐरोली रुग्णालयांत लसीकरण करण्यात येत आहे. शहरातील ११ खासगी रुग्णालयांची निवड शासनामार्फत करण्यात आली असून त्यांच्यासाठी पालिकेने लसीकरणाचे प्रशिक्षणही दिले आहे. लवकरच या ११ केंद्रांवरही लसीकरण सुरू होईल.      -अभिजित बांगर, आयुक्त, महापालिका

या ठिकाणी लसीकरण

डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय, नेरुळ

सुयश हॉस्पिटल, सीवूड्स

इंद्रावती हॉस्पिटल, ऐरोली

डिव्हाइन मल्टिस्पेशालिटी, हॉस्पिटल

सनशाइन हॉस्पिटल, नेरुळ

तेरणा हॉस्पिटल, नेरुळ

सुश्रुषा हॉस्पिटल, नेरुळ

मंगलप्रभू नर्सिग होम, जुईनगर

आचार्य श्रीज्ञानेश हॉस्पिटल, नेरुळ

डॉ. आर. एन. सूरज हॉस्पिटल, सानपाडा

एमपीसीटी हॉस्पिटल, सानपाडा

११५ नवे करोनाबाधित

नवी मुंबई : नवी मुंबईत गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन करोना रुग्णांची संख्यावाढली असून  मंगळवारी १५१  नवे करोनाबाधित आढळले  तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण वाढ झाल्याने शहरातील करोनाबाधितांची संख्या  ५५,६६५  इतकी झाली आहे. शहरात करोनामुक्तीचा दर ९६ टक्के  सोमवारी १३१ जण करोनामुक्त झाले. आतापर्यंत ५३,१९४  जण करोनामुक्त झाले आहेत. उपचाराधिन रुग्ण १,३५०  इतके आहेत. तर एकूण मृत्यू  झालेल्यांची संख्या ११२१  इतकी झाली आहे