नवी मुंबई : खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी सानपाडा पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हा प्रकार सानपाडा सेक्टर ४ येथे घडला.

अशोक जाधव (वय ३१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अशोक हा चेंबूर येथे एका शाळेत शिक्षकाची नोकरी करीत असून सानपाडा सेक्टर ४ येथे खाजगी शिकवणीचे वर्गही घेत असतो. काल संध्याकाळी (ता.२९) साडेपाचच्या सुमारास शिकवणी वर्ग सुटल्यावर पीडित युवती आणि तिची मैत्रीण घरी जाण्यास निघाले असता, अशोक यांने पीडित युवतीला काही टिपणं देण्याच्या कारणाने थांबवून घेतले. सर्वजण गेल्यावर पीडित मुलीशी जवळीक साधत लैंगिक शोषण केले. झाल्याप्रकाराने पीडित युवतीला धक्का बसला होता.

जेव्हा ती घरी जाण्यास निघाली त्यावेळेस तिला रस्त्यात तिचे काका भेटले. तिची अवस्था पाहून त्यांनी तिला नेमके काय झाले हे विचारले असता तिने घडलेला प्रकार कथन केला.

तिच्या काकाने याबाबत सानपाडा पोलीस ठाण्यात अशोक विरोधात तक्रार दिली.

या प्रकरणी लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली असून त्याला रात्री अटक करण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज पाडवी यांनी दिली आहे.