सीमा भोईर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पनवेल स्थानकात बेकायदा पार्किंगमुळे वाहतुकीत अडथळे

प्रचंड वर्दळीचे पनवेल एसटी स्थानक आधीच खड्डे, कचरा, सांडपाणी अशा विविध समस्यांनी ग्रासलेले असताना आता त्यात आणखी नव्या समस्येची भर पडली आहे. येथे खासगी वाहने बेकायदा पार्क केली जात आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या गैरसोयींत भर पडली आहे.

पनवेल एसटी स्थानकात एसटीव्यतिरिक्त अनेक खासगी वाहने थांबवली जात आहेत. बस स्थानकात खासगी वाहनांना प्रवेश करण्यास मज्जाव असताना खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहने सर्रास उभी केली जात आहेत. अशा बेकायदा पार्किंगवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

पनवेल एसटी स्थानक परिसरात बस उभ्या करण्याच्या ठिकाणी नो-पार्किंगचा फलक लावण्यात आला आहे, त्याला न जुमानता खासगी दुचाकी वाहनचालक आपली वाहने सर्रास बसस्थानक परिसरात पार्क करतात. या वाहनांमुळे प्रवाशांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. तसेच वाहने बेशिस्तपणे पार्क केल्यामुळे बसची मागून धडक बसून किरकोळ स्वरूपाचे अपघातही घडू लागले आहेत. नो-पार्किंग क्षेत्रात वाहने उभी करणाऱ्यांवर एस.टी.महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस वाहतूक शाखेतील कर्मचारी का कारवाई करत नाहीत, असा सवाल स्थानकातील प्रवासी  करत आहेत.

एसटी स्थानकात कोणतेही खासगी वाहन उभे करण्याची परवानगी नाही, त्यामुळे नियमांना न जुमानता जे स्थानकात वाहने उभी करतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. अशी वाहने  स्थानकातून हटविण्यात येतील.

– विलास गावडे, आगार व्यवस्थापक

एसटी स्थानकात एसटीव्यतिरिक्त पार्क केल्या जाणाऱ्या खासगी वाहनांवर कारवाई करण्यत यावी. बऱ्याचदा या वाहनांमुळे एसटी मागे-पुढे जाण्यात अडचण निर्माण होते. प्रवाशांनाही ये-जा करताना अडथळे येतात.

– ममता सूर्यवंशी, प्रवासी

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Private vehicles in st station
First published on: 19-09-2018 at 03:38 IST