सुरक्षरक्षकांबरोबर वाद; अधिकारी म्हणतात, ‘किरकोळ प्रकरण’

नवी मुंबई : शहरात फेरीवाल्याची समस्या वाढत आहे. वाशीत बेकायदा फेरीवाल्यांवर नजर ठेवण्यासाठी सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. मात्र शहराबाहेरील बेकायदा फेरीवाल्यांची दादागिरीला त्यांना सामोरे जावे लागत आहे. पालिकेच्या कार्यालयात बसलेले ‘साहेब’ याकडे फारसे लक्ष देत नसल्याची खंतही हे सुरक्षारक्षक व्यक्त करीत आहेत.

वाशी सेक्टर ९, १० आणि १५ या ठिकाणी फेरीवाले बसतात. यातील बहुतांश फेरीवाले हे मानखुर्द, गोवंडी, चेंबूर लाल डोंगर परिसरातील असल्याचा दावा स्थानिक फेरीवाले करत आहेत, यातून त्यांच्यात अनेकदा वाद होत आहेत.

फेरीवाल्यांवर सतत कारवाई शक्य नसल्याने या परिसरात महापालिकेने सुरक्षारक्षक नेमले आहेत. मात्र बाहेरून येणारे फेरीवाले या सुरक्षारक्षकांच्या अंगावर धावून जात आहेत. असे प्रकार गेल्या तीन दिवसांत तीन वेळा घडले आहेत. गुरुवारी संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास चेंबूर येथील बंजारा महिला आणि सुरक्षारक्षक यांच्यात वाद झाला. निदान रस्त्यात पार्किंगमध्ये धंदा लावू नका असे सुरक्षारक्षकांचे म्हणणे होते, तर मी पाहिजे तेथे धंदा करेल असा पवित्रा त्या महिलेने घेतला. विशेष म्हणजे वाद झाला की महिला पुढे येतात. बुधवारीही एका सुरक्षारक्षकावर पाच ते सहा फेरीवाले धावून गेले होते, मात्र स्थानिक दुकानदारांनी मध्यस्थी केली.

हे प्रकार वाढत आहेत, मात्र ठोस उपाययोजना वरिष्ठ अधिकारी घेत नाहीत. काही मध्यस्थीच्या मार्फत साटेलोटे होते, तोंडावर पडतात ते सुरक्षारक्षक अशी माहिती २० वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या एका परवानाधारक व्यावसायिकाने दिली.

वादावादी असेल! याबाबत वाशी विभाग

अधिकारी महेश हनशेट्टी यांना विचारणा केली असता बुधवारी सुरक्षारक्षक आणि फेरीवाले यांच्यात वाद होत सुरक्षारक्षकाला मारहाण झाल्याचे कळले होते. याबाबत गुरुवारी सकाळी पूर्ण चौकशी केली. मात्र मारामारी न झाल्याचे समोर आले. वादावादी झाली असू शकते, फार काही गंभीर झाले नाही असे उत्तर देण्यात आले.