टाळेबंदीनंतर नवी मुंबईतील वायू प्रदूषणात वाढ झाली आहे. महापे, तळोजातील प्रदूषणामुळे त्रस्त नवी मुंबई, पनवेलकरांना आता मुंबईतील कचराभूमींचा त्रासही सहन करावा लागत आहे. त्यामुळे सकाळ, संध्याकाळी श्वास कोंडत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

मुंबई पालिका क्षेत्रातील गोवंडी व कांजूरमार्ग कचराभूमीचा त्रास आता वाशी, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली येथील नागरिकांना मोठय़ा प्रमाणात होऊ लागला आहे. कचरावेचक काही वस्तूंच्या शोधात या कचऱ्याला आग लावत असून धुराचा त्रास नवी मुंबईकरांना जाणवू लागला आहे.

ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी ही समस्या पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे मांडली असून मुंबई पालिकेला पत्र देऊन या समस्येचे निवारण करण्यात यावे अशी सूचना केली आहे. या धुरांडय़ामुळे सकाळी चालण्यास जाणाऱ्या या भागातील नागरिकांना श्वसनाचे त्रास जाणवू लागले आहेत. वाशी येथील सी शोअरवरील प्रभात फेरीच्या नागरिकांनी याबाबत तक्रारी केल्या आहेत.