ऐरोली, कोपरखैरणे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प; नागरी वसाहतीवरील पाण्याचा ताण कमी होणार

विकास महाडिक, नवी मुंबई</strong>

केंद्र व राज्य सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत प्रत्यक्षात येणाऱ्या नवी मुंबई पालिकेच्या ऐरोली व कोपरखैरणे येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून पालिका समोरच्या एमआयडीसीला हे पाणी १८ रुपये घन लिटरने विकणार आहे. अशा प्रकारे उद्योगधंद्याने सांडपाणी विकणारी नवी मुंबई पालिका ही राज्यातील पहिली पालिका आहे. यापूर्वी हे वाशी व नेरुळ येथे असा प्रकल्प उभारण्यात आला आहे पण त्याचे पाणी खात्रीलायकरीत्या उद्योजकांना विकण्यात आलेले नाही. ते केवळ एनआरआयसारख्या मोठय़ा गृहनिर्माण सोसायटीतील तरण तलाव व उद्यानांना विकण्यात आले आहे.

नवी मुंबई पालिका क्षेत्रात दिवसाला ३८० दशलक्ष लिटर पाणी वितरित केले जाते. यातील सुमारे तीनशे एमएलडी पाणी हे मलवाहिन्यांद्वारे बाहेर टाकले जाते. पालिका या पाण्यावर प्रक्रिया करून नंतर ते ठाणे खाडीवाटे समुद्रात सोडत आहे. काही वर्षांपूर्वी पालिकेने नेरुळ व वाशी येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील पाण्यावर प्रक्रिया करून पिण्यायोग्य झालेले (असा पालिकेचा त्या वेळी दावा होता) पाणी उद्यानांसाठी  वापरले जात आहे. प्रक्रियेनंतर पिण्यायोग्य असलेल्या या पाण्याला पिण्यासाठी मात्र कोणी खरेदीदार लाभला नाही. त्यामुळे ते पाणी सार्वजनिक वापरासाठी वापरले जात आहे.

केंद्र व राज्य सरकाच्या अमृत योजनेअंतर्गत मिळालेला निधी शहरातील काही हरितपट्टे विकसित करण्यावर तसेच ऐरोली व कोपरखैरणे येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रावर प्रकल्प उभारण्यासाठी वापरण्याचे दोन वर्षांपूर्वी पालिका प्रशासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार ३९८ कोटी रुपये खर्चाचा या प्रकल्पाची नुकतीच निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून हे काम टेक्टोन इंडिया या आखाती देशात अशा प्रकारचे प्रकल्प उभारणाऱ्या कंपनीला देण्यात आले आहे.

ऐरोली व कोपरखैरणे येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रात हे पाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारले जाणार असून त्यावर १५० कोटी रुपये खर्च होणार आहेत. त्यानंतर पुढील १५ वर्षे ही कंपनी या प्रकल्पाची देखरेख व संचालन करणार असल्याने त्यांना २४८ कोटी रुपये दिले जाणार आहेत.

पालिका हे पाणी रबाले, महापे, खैरणे या एमआयडीसीतील उद्योगधद्यांना पुरविणार त्याचा दर प्रति १८ रुपये क्युबिक लिटर राहणार आहे. याच निधीतून पालिका प्रकल्पाचा खर्च वसूल करणार आहे.

सांडपाणी प्रक्रियातून मिळणारे पाणी या औद्योगिक वसाहतील मिळाल्यानंतर बारबी धरणाचे पाणी एमआयडीसी भागात असलेल्या लोकवस्तीला वापरता येणार आहे. एमआयडीसी भागातील नागरी वसाहतीला ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई भासत असून पाण्यावरून संघर्ष उद्भवण्याची अनेक वेळा घटना झालेल्या आहेत. त्यामुळे औद्योगिक वसाहतीला सांडपाण्याचा पुनर्वापर झालेले पाणी मिळाल्यास नागरी वसाहतीवरील पाण्याचा ताण कमी होणार असल्याने पालिकेने हा प्रकल्प प्राधान्याने घेतला आहे.  कोपरखैरणे व ऐरोली या दोन उपनगरांच्या समोरील एमायडीसी भागात खूप मोठय़ा आयटी कंपन्या व रिलायन्स उद्योग समूहासारख्या कंपन्या उभ्या राहिलेल्या आहेत. या कंपन्यांच्या उद्यान तसेच शौचालयांवर लाखो लिटर पिण्याचे पाणी वापरले जाणार असल्याने हा सांडपाणी प्रक्रियायुक्त पाणी या कंपन्यांना स्वस्त दरात पडणार आहे. पाणी खरेदीसाठी असलेला ग्राहक बघून पालिकेने हा प्रकल्प उभारला असून अशा प्रकारचा व्यावसायिक प्रकल्प उभारणारी नवी मुंबई राज्यातील पहिली पालिका ठरली आहे.

आचारसंहितेमुळे बोलण्यास नकार

आखाती देशातील विविध देशांत अशा प्रकारचे सांडपाणी तसेच खाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करण्याचे प्रकल्प उभारणाऱ्या टेक्टोन कंपनीला हे काम देण्यात आले असून देशाच्या अणुऊर्जा प्रकल्पासाठी लागणारे पाणीदेखील ही कंपनी प्रक्रिया करून देत आहे. १८ महिन्यांत हे काम पूर्ण केले जाणार असून पालिका १८ रुपये घन लिटरने पाणी विकून पैसा कमविणार आहे. आचारसंहिता लागल्याने तसेच पालिकेच्या कोणत्याही प्रकल्पाविषयी माहिती एकाच अधिकाऱ्याने देण्याचा फतवा प्रशासनाने काढल्याने या सकारात्मक विषयावरही कोणताही अधिकारी बोलण्यास तयार नाही.