निविदेला दुसऱ्यांदा मुदतवाढ; कंपन्यांकडून महापालिकेला फक्त विचारणा

नवी मुंबई : लस उपलब्ध होत नसल्याने मुंबई महापालिकेप्रमाणे नवी मुंबई महापालिकेनेही लस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी काढलेल्या जागतिक निविदांना मुदतवाढ देऊनही काहीही प्रतिसाद मिळाला नाही. मुंबई पालिकेच्या निविदांना तरी काही कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे लस खरेदी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. पालिकेने दुसरी मुदतवाढ दिली आहे.

नवी मुंबई महापालिकेने शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना लस देण्याचे ठरविले आहे. यासाठी मोठय़ा प्रमाणात लसीकरण केंद्र उभारली आहेत. तर पुढील काळात प्रत्येक प्रभागात लसीकरण केंद्र उभारण्यात येणार असून यासाठी पालिकेच्या शाळांचा उपयोग करण्यात येणार आहे. त्यामुळे पालिकेने तयारी केली आहे, मात्र लस कुठे आहे, असा प्रश्न प्रशासनासमोर आहे. सद्य:स्थितीत केंद्र किंवा राज्य सरकार जो लसपुरवठा करीत आहे, त्यावर प्रशासन अवलंबून आहे.

हा प्रश्न सोडविण्यासाठी पालिकेची आर्थिक परिस्थितीही चांगली असल्याने चार लाख लस कुप्या खरेदी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी १६ मे रोजी जागतिक निविदा प्रसिद्ध केली होती. यासाठी २२ मेपर्यंतची मुदत देण्यात आली होती, मात्र एकाही कंपनीने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आठ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. तीही मुदत संपली तरी एकाही कंपनीने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आता दुसरी मुदतवाढ देण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. राज्य शासनाप्रमाणे मुंबई महापालिकेनेही लस खरेदीसाठी जागतिक निविदा काढली होती. त्यांना आठ कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या निविदांना मात्र मुदतवाढीनंतरही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दुसरी मुदतवाढ द्यावी लागली आहे. त्यामुळे लस खरेदीची पालिका प्रशासनाला तयारी असली तरी लस खरेदी करता येत नाही.  मात्र पालिका प्रशासनाला लस खरेदीची आशा कायम आहे. भारत बायोटिक, सीरम तसेच स्पुटनिक या कंपन्यांनी संपर्क केला असून खासगी रुग्णालयांना लस प्राप्त होत आहे. त्यामुळे पालिकेच्या निविदेलाही प्रतिसाद मिळेल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

नवी मुंबई महापालिकेने ४ लाख लस खरेदीसाठी निविदा मागवलेल्या आहेत. लस कंपन्यांकडून पालिकेकडे विचारणा करण्यात आली आहे. तसेच खरेदी दराबाबतही विचारणा होत आहे, परंतु अद्याप कोणीही प्रतिसाद न दिल्याने आठ दिवसांची दुसरी मुदतवाढ देण्यात आली आहे. तिसऱ्या लाटेपूर्वी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठीच लस खरेदीचा प्रयत्न आहे.

अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका