आता मार्च २०२०ची मुदत

डिसेंबर २०१९ पर्यंत नवी मुंबईतील विमानतळावरून पहिले उड्डाण होणारच, असे ठासून सांगणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळ प्रकल्पग्रस्तांसमोर हात टेकले आहेत. पुढच्या वर्षी डिसेंबरअखेर विमानतळावर होणारे पहिले उड्डाण आता कमीत कमी तीन महिने लांबणीवर पडले आहे. आता ही मुदत मार्च २०२० अशी जाहीर करण्यात आली आहे.

नवी मुंबई विमानतळ प्रकल्पात दहा गावे विस्थापित होत असून प्रकल्पग्रस्त स्थलांतर करण्यास नाखूश आहेत. तीन हजार कुटुंबांपैकी केवळ एक हजार प्रकल्पग्रस्त स्थलांतर झालेले आहे.

नवी मुंबई विमानतळासाठी एकूण २२६८ हेक्टर जमीन लागणार आहे. त्यातील ६७१ हेक्टर जमीन ही दहा गावे स्थलांतरित केल्यानंतर खुली होणार आहेत. या प्रकल्पग्रस्तांनी पुनर्वसन पॅकेज स्वीकारले आहे. त्याचे फायदेदेखील ते घेत आहेत, पण गावातील काही छोटय़ा-मोठय़ा मागण्या प्रलंबित आहेत. त्यामुळे दहा गावांपैकी चार गावे स्थलांतर करण्यास तयार नाहीत. त्यात स्थलांतर न होणाऱ्या तीन गावांनीदेखील पावसाळ्यात पाणी भरल्याने स्थलांतराची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे सिडकोसमोर तिढा निर्माण झाला आहे. प्रकल्पग्रस्तांनी गाव खाली न केल्यास विकासकाला सर्व जमीन ताब्यात देता येत नाही. त्यामुळे गाभा क्षेत्रातील धावपट्टीचे काम करता येणे शक्य नाही. पावसाळ्यापर्यंत हे सर्व प्रकल्पग्रस्त गावे खाली करतील अशी सिडकोची अपेक्षा होती, पण ग्रामस्थ गाव खाली करण्याचे नाव घेत नाहीत. त्यामुळे डिसेंबर २०१९ पर्यंत विमानतळावरील पहिले उड्डाण होण्याची आशा मावळली आहे. हे उड्डाण आता मार्च २०२० पर्यंत होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे येत्या डिसेंबपर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी प्राधान्यक्रम दिला जाणार असून उच्च अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे.

* पावसाळ्यापर्यंत हे सर्व प्रकल्पग्रस्त गावे खाली करतील अशी सिडकोची अपेक्षा होती, पण ग्रामस्थ गाव खाली करण्याचे नाव घेत नाहीत. त्यामुळे डिसेंबर २०१९ पर्यंत विमानतळावरील पहिले उड्डाण होण्याची आशा मावळली आहे.