19 November 2019

News Flash

मालमत्ता कर अभय योजना १ डिसेंबरपासून लागू

महापालिका सर्वसाधारण सभेत मालमत्ता कराच्या प्रभावी वसूलीकरिता अभय योजना लागू करण्यास मंजूरी देण्यात आली होती.

दोन टप्प्यांत भरणा करण्याची मुभा

नवी मुंबई शहरातील थकित मालमत्ताकर धारकांना करिता नवी मुंबई महानगरपालिका येत्या १ डिसेंबरपासूनमालमत्ताकर अभय योजना लागू करणार आहे. त्यामुळे थकीत मालमत्ता धारकांना दिलासा मिळणार आहे.

नवी मुंबई शहरात १ लाख ४५ हजार ८८७ थकीत मालमत्ताकर धारक असून त्यामध्ये ६८ हजार ६३३ गांवठाण, १५ हजार ८०१ विस्तारित गांवठाण आणि ५८ हजार ९९१ सिडको विकसित नोडमधील मालमत्ता , सोसायटी भूखंड यांचा समावेश आहे. अनेक ठिकाणी सीआरझेड नियमावलीसारखे नियमात बदल झाल्यामुळे अनेक नागरिकांच्या मालमत्ता करावर दंडनीय कर आकारणी होत आहे. या मालमत्ता तसेच शासकीय-निमशासकीय मालमत्ता, शासन अंगीकृत उपRम व महानगरपालिका क्षेत्रातील इतर मालमत्ता यांना अभय योजना लागू केल्याने थकीत मालमत्ता कराची प्रभावीपणे वसूली होण्यास मदत होणार आहे.

२७ फेब्रुवारी २०१९ रोजीच्या महापालिका सर्वसाधारण सभेत मालमत्ता कराच्या प्रभावी वसूलीकरिता अभय योजना लागू करण्यास मंजूरी देण्यात आली होती. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम १५२(१) (अ) अन्वये यास शासन मान्यता मिळणे आवश्यक असल्याने १४ मे २०१९ रोजीच्या पत्रान्वये महापालिका आयुक्तांनी हा प्रस्ताव शासन मान्यतेसाठी पाठविला होता. याबाबत शासन स्तरावर महापौर जयवंत सुतार आणि महापालिका आयुक्त  अण्णासाहेब मिसाळ यांच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. या अनुषंगाने शासन निर्णय दि.१३  सप्टेंबर २०१९ नुसार महानगरपालिका क्षेत्रातील थकीत मालमत्ता कराची प्रभावीपणे वसूली करण्याकरिता अभय योजना लागू करण्यास मंजूरी देण्यात आली. योजना लागू केलेल्या दिवसापासून पुढील ४ महिने दोन टप्प्यात ही मालमत्ताकर अभय योजना लागू राहणार आहे.

त्यानुसार महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी  १ डिसेबर २०१९ पासून शहरातील थकीत मालमत्ताकर धारकांना अभय योजना लागू करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे.  अभय योजनेखाली मूळ कराच्या रकमेत कोणतीही सवलत लागू राहणार नाही. केवळ शास्ती ,व्याज यांच्या देय रकमेत जाहीर केल्याप्रणाणे सवलत राहणार आहे. कराशिवाय शास्ती / व्याज भरलेल्या रकमेच्या संदर्भात कोणतीही सूट मिळणार नाही, तसेच त्यांचा परतावा देखील मिळणार नाही. त्याचप्रमाणे, अभय योजना सुरू होण्यापूर्वी किंवा समाप्तीनंतर भरणा केलेल्या कोणत्याही रक्कमांना अभय योजना लागू राहणार नाही . तसेच अभय योजना सुरु होण्यापूर्वी भरणा केलेल्या कोणत्याही रक्कमेच्या परताव्यासाठी अभय योजनेअंतर्गत दावा करता येणार नाही.

नवी मुंबई महानगरपालिकेची मालमत्ता कराची थकबाकी २१०० कोटी रूपयांपेक्षा अधिक असून या अभय योजनेमुळे थकबाकीदार नागरिकांना मोठय़ा प्रमाणावर दिलासा मिळणार आहे.

चार महिन्यात दोन टप्यात योजना लागू राहणार

  १ डिसेंबर २०१९ ते ३१ जानेवारी २०२० या दोन महिन्यांच्या कालावधीत थकीत मालमत्ताकराची रक्कम अधिक २५ टक्के दंडात्मक रक्कम भरणा केल्यास दंडात्मक रक्कमेतून ७५ टक्के माफी मिळणार आहे.

 १ फेब्रुवारी २०१० ते ३१ मार्च २०२० या पुढील दोन महिन्यांच्या कालावधीत थकीत मालमत्ताकराची रक्कम अधिक ३७.५० टक्के दंडात्मक रक्कम भरणा केल्यास दंडात्मक रक्कमेतून ६२.५० टक्के माफी मिळणार आहे.

First Published on November 6, 2019 12:55 am

Web Title: property tax abhay yojna akp 94
Just Now!
X