आयुक्त डॉ. रामास्वामी यांच्याशी चर्चा

मुंबईतील ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्यास मुख्यमंत्र्यांनी अनुकूलता दर्शवली असताना आता नवी मुंबईतही ५०० चौरस फुटांखालील घरांना मालमत्ता कर माफ करण्यात यावा यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. विविध मागण्या आणि समस्यांसंदर्भात गुरुवारी शिवसेनेच्या नेत्यांनी आयुक्त डॉ. रामास्वामी एन यांच्याशी चर्चा केली. पालिका मुख्यालयात आयुक्त कार्यालयात सुमारे पाऊण तास चर्चा सुरू होती.

नवी मुंबई महापालिकेत अनेक प्रभागांतील नागरी कामे रखडली आहेत. आरोग्य सुविधा, प्रकल्पग्रस्तांची घरे, परिवहन सेवा या संदर्भात अनेक प्रश्न आहेत. गेल्या आर्थिक वर्षांत अंदाजपत्रकाप्रमाणे खर्च करण्यात आलेला नाही. अंदाजपत्रकातील अनेक कामे, प्रकल्प कागदावरच राहिले आहेत, या प्रश्नांबाबत पालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले. या वेळी खासदार राजन विचारे, उपनेते विजय नाहटा, गटनेते द्वारकानाथ भोईर, विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांसह विभागप्रमुख, सर्व नगरसेवक, परिवहनसह शिवसेनेचे विविध पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

प्रकल्पग्रस्तांच्या घरांबाबत शासन दरबारी निर्णय होत असताना पालिका मात्र त्यांच्या घरावर सातत्याने कारवाई करत आहे. शहरात आरोग्याचा प्रश्न भेडसावात असताना पालिकेने बांधलेली रुग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाहीत. त्यामुळे शहरातील रुग्णांचे हाल होत आहेत. ही रुग्णालये लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने सुरू करावीत. शहरात पार्किंगचा प्रश्न डोकेदुखी ठरला आहे, त्यामुळे ठिकठिकाणी वाहनतळांची सोय करावी. सफाई कामगारांनाही त्यांच्या वेतनातील फरक तात्काळ देण्यात यावा. कंडोनियमची कामे बंद असून ती त्वरित सुरू करावीत. खासदारांनी अनेक कामांसाठी आपला निधी दिला असूनही ती कामे संथ गतीने होत आहेत. त्यामुळे आयुक्तांनी प्रत्यक्ष भेट देऊन कामे मार्गी लावावीत. ऐरोलीतील नाटय़गृहाचे काम अनेक वर्षे रखडले आहे. अंदाजपत्रकाप्रमाणे कामे होत नाहीत.

निधीचा योग्य विनियोग केला जात नाही. त्यामुळे पालिकेतील प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावीत, इत्यादी मागण्या शिवसेनेने निवेदनात केल्या आहेत.