विकास महाडिक

डिसेंबर ते मे या सहा महिन्यांतच फुलशेतीचे अर्थकारण फुलविणाऱ्या राज्यातील शेकडो फूल शेतकऱ्यांचा बाजार करोनाच्या जागतिक थैमानामुळे उठला आहे. मेहनत-मशागतीने उभे केलेले विविधरंगी फुलांचे ताटवे उकिरडय़ावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. राज्यातील सुमारे १५ हजार हेक्टरवरील फुलशेतीचे एक हजार कोटींचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

देशात फुलांचा व्यापार २० टक्के वाढला होता. खेळते भांडवल देणारे हे निर्यातक्षम उत्पादन राज्यातील पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, नांदेड, उस्मानाबाद आणि काही प्रमाणात कोकणात घेतले जात होते.   त्यासाठी लाखो रुपये (कमीत कमी २५ लाख) खर्च करून हरितगृह (पॉली हाऊस) उभारण्यात आली . टाळेबंदीमुळे निर्यात संपली आणि  फुलांचा  पर्यायी वापर होत नसल्यााने नुकसान वाढल्याचे  पुण्यातील कृषी अधिकारी गोपाळ हांडे आणि  मावळ  तालुक्यातील निर्यातदार शेतकरी संभाजी भद्रे यांनी सांगितले.

शेवटची कमाई..

परदेशात गुलाब, जरबेरा, ग्लॅडओलस, कार्नेशन, ऑर्किड, अ‍ॅन्थुरियम या फुलदांडे प्रकारातील फुलांना मोठी मागणी आहे. नगावर या फुलांचा दर ठरविला जातो. त्यांची निर्यात मोठय़ा प्रमाणात केली जाते. देशांतर्गत सणासुदीला जाई, जुई, मोगरा, अबोली, झेंडू, अ‍ॅस्टर, शेवंती ही फुले ‘भाव’ खाऊन जातात. पण डिसेंबरपासून चीनमधून सुरू झालेल्या करोनाच्या प्रादुर्भावानंतर फुलांची परदेशातील निर्यात हळूहळू ठप्प झाली. त्यामुळे फेब्रुवारीमधील ‘व्हॅलेंटाइन डे’साठी केलेली गुलाबांची निर्यात आणि गुढीपाडव्याला राज्यातच विकलेली झेंडूची फुले ही राज्यातील फूल शेतकऱ्यांची शेवटची ‘कमाई’ ठरली आहे.