नोटाबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेची फसवणूक केली आहे. नोटाबंदीचा फटका प्रामुख्याने सामान्य जनता, मजूर आणि शेतकऱ्याला बसला आहे. यातून काळे धन बाळगणाऱ्यांना सूटच मिळाली आहे, असा आरोप करत कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने बेलापूर येथील रिझव्‍‌र्ह बँकेसमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी बँकेच्या प्रवेशद्वारासमोर काही काळ ठिय्या दिल्याने वाहतूक व्यवस्थेत बदल करावा लागला.

या वेळी आंदोलनकर्त्यांनी मोदींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कम्युनिस्ट नेते डॉ. भालचंद्र कानगो यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. या वेळी ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनचे उपाध्यक्ष विश्वास उटगी उपस्थित होते. देशातील ७० टक्के अर्थव्यवस्था ही रोखीने चालते; मात्र नोटाबंदीनंतर त्याचा सर्वात मोठा फटका विविध कारखान्यांतील मजुरांना बसला आहे, असे ते म्हणाले.