नवी मुंबई, पनवेल परिसरांत नव्या नियमावलीला विरोध; पोलिसांच्या सक्त अंमलबजावणीवरही नाराजी;

राज्य सरकारने सोमवारी रात्रीपासून लागू केलेल्या अंशत: टाळेबंदीला नवी मुंबई, पनवेल, उरण या महामुंबई क्षेत्रांत मंगळवारी दुपारनंतर खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. सुरुवातीला टाळेबंदी केवळ आठवडाअखेर असल्याच्या कल्पनेने व्यापाऱ्यांनी सकाळी सर्व व्यवहार नित्यपणे सुरू केले. मात्र पोलीस व पालिका अधिकाऱ्यांनी सक्तीने अंमलबजावणी करण्यास सुरुवात केल्यानंतर दुपारनंतर निर्बंध असलेली दुकाने बंद करण्यात आली. खारघरमध्ये या नियमावलीला विरोध करत रस्त्यावर उतरलेल्या महिला व्यापारी, विक्रेत्यांनी पोलिसांची गाडी अडवली तर कळंबोलीमध्ये दुकानदारांनी प्रभाग कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

राज्य सरकारच्या नियमावलीला अनुसरून नवी मुंबई, पनवेल महापालिका प्रशासनांनी आपापल्या पालिका क्षेत्रासाठी कडक निर्बंध जारी केले. मात्र या नियमावलीबाबत व्यापारीवर्गात सुरुवातीपासूनच संभ्रम आहे. ही नियमावली शुक्रवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत लागू असेल, असा अनेकांचा समज होता. तर जेव्हा प्रत्यक्ष नियम लक्षात आला तेव्हा नेमके काय बंद असेल, काय नाही, या प्रश्नाने व्यापारीवर्गात संभ्रम निर्माण झाला. तरीही अनेक ठिकाणी मंगळवारी सकाळी दुकाने सुरू करण्यात आली होती. मात्र पालिका व पोलीस पथकांनी सक्तीने हे व्यवहार बंद करण्यास भाग पाडले.  राज्य सरकारच्या या अंशत: टाळेबंदीला विविध भागांतून विरोध होत असून नवी मुंबई व्यापारी महासंघाने विरोध केला असून करोनाने कमी मृत्यू पावतील पण या टाळेबंदीने जास्त मरतील अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. त्यामुळे बेलापूर, नेरुळ, वाशी, कोपरखैरणे, ऐरोली येथील व्यापाऱ्यांनी सकाळी काही काळ दुकाने उघडून या टाळेबंदीला विरोध केला, पण नंतर पालिका व पोलिसांच्या गस्त सुरू झाल्यानंतर ही दुकाने बंदी करण्यात आली. जमावबंदी असल्याने पाचपेक्षा जास्त नागरिक एकत्र आल्यास त्यांच्यावर कारवाई होणार असल्याने ही पांगापांग झाली.

या निर्बंधांमुळे जगायचं कसं, असा पेच निर्माण झाल्याचे सांगत खारघरमध्ये महिला व्यापारी, विक्रेत्या रस्त्यावर उतरल्या. या वेळी आलेली पोलिसांनी जमावाने अडवली व पोलीस अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. आम्ही सर्व नियम पाळू, मात्र कडक निर्बंधांच्या नावाखाली लावलेली टाळेबंदी हटवा, अशी विनवणी या महिलांनी केली. मात्र हे सगळे होत असताना या ठिकाणी अंतरनियम आणि मुखपट्टी  बंधन पूर्णपणे दुर्लक्षित झाल्याचे दिसले. कळंबोली प्रभाग कार्यालयासमोर परिसरातील दुकानदारांनी ठिय्या आंदोलन केले. हे आंदोलन करताना मात्र या दुकानदारांनी सामाजिक अंतर पाळल्याचे दिसून येत होते. वाशी येथील काही अंतर्गत भागात दुकाने सुरू होती, मात्र मुख्य रस्त्यावरील दुकाने पोलीस व पालिका अधिकाऱ्यांनी दुपारनंतर जबरदस्तीने बंद पाडली. या संकटकाळातही उपाहारगृह सुरू ठेवण्यास परवानगी असल्याने वाशी रेल्वे स्थानकाबाहेरील खाऊगल्ली सुरू होती. उरण येथे करोना रुग्णांची संख्या मर्यादित आहे. तरीही येथील व्यापारी संघटनेने विरोध न करता अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद केल्याचे दिसून येते.

एपीएमसी निगडित सर्व सेवा तसेच वैद्यकीय सेवा या अत्यावश्यक सेवेत येतात. वास्तविक अशाच ठिकाणी सध्या गर्दी होत असून अन्य दुकानांत तुरळक ग्राहक आहेत. हा निर्णय घेताना मोठमोठय़ा उद्योजकऐवजी छोटय़ा व्यापाऱ्यांना विश्वासात घेतले असते तर जास्त सयुक्तिक ठरले असते. प्रत्यक्षात मंगळवारी चार वाजता मनपाला आदेश आल्याची माहिती मिळाली, मग पोलीस सकाळपासून कसे बंद ठेवत होते?

– प्रमोद जोशी, अध्यक्ष, मुंबई किरकोळ व्यापारी संघटना

कठोर नियम

नवी मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या आठ हजारांच्या वर गेली असून दीड हजार रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. त्यामुळे नवी मुंबई पालिका प्रशासन अधिक सक्रिय झाले असून राज्य सरकारच्या उपाययोजनांबरोबरच शहरासाठी काही स्थानिक निर्णय आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतलेले आहेत.  संपूर्ण शहरात  तीन प्रकारची प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर करण्यात आली आहेत.