शहरात ठिकठिकाणी भक्तांकडून पुस्तक, ‘व्हॉट्स अॅiप’चा आधार; घरगुती गणेशपूजेमध्ये वाढ

दिवसाला ३० ते ४० पूजा बांधायच्या असतात. एका पुरोहितासाठी हे काम तसे आवाक्याच्या बाहेरचे आहे. त्यामुळे अनेक घरगुती आणि सार्वजनिक गणेशपूजेसाठी पुरोहित पुरेनासे झाले आहेत, अशा प्रतिक्रिया सध्या नवी मुंबईतील पुरोहित देत आहेत. शहरात सार्वजनिक आणि घरगुती गणेशमूर्तीची संख्या दरवर्षी वाढू लागली आहे. सोमवारी श्रींच्या मूर्तीची मुहूर्तावर प्रतिष्ठापना करण्यासाठी काही घरांमध्ये पुरोहित न मिळाल्याने अनेकांनी पुस्तकातील गणेशमंत्रांचा, तर काहींनी व्हॉटस् अ‍ॅपवरील मजकुराचा आधार घेत पूजा आटोपून घेतल्याचे चित्र होते.

शहरात ४०० सार्वजनिक आणि २८ हजार घरगुती गणेशमूर्ती मखरात विराजमान झाल्या आहेत. नवी मुंबईत केवळ मराठी माणूसच गणेशोत्सव साजरा करण्यात आघाडीवर नाही, तर यात अमराठी भाविकांचीही संख्या मोठी आहे. मंडळांचे दरवर्षी ठरलेले पुरोहित असतात; परंतु घरगुती गणेशोत्सवांची संख्या वाढत चालली आहे, असे पुरोहित अतुल जोशी यांनी सांगितले. गणेशोत्सव कोकणापुरताच मर्यादित राहिलेला नाही. तो महाराष्ट्रातील इतर लोकही साजरा करू लागले आहेत. यात दक्षिण आणि उत्तर भारतीयांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पुरोहित कमी पडल्याचे जोशी यांनी स्पष्ट केले.

गणेशोत्सव काळात कमाईचा कळस

पुरोहितांची जास्त मागणी लक्षात घेता जवळच्या पश्चिम व उत्तर महाराष्ट्रातून पुरोहित काही दिवस मुंबई आणि आजूबाजूच्या भागात सध्या तळ ठोकून आहेत. एका पूजेसाठी एक ते पाच हजार रुपयापर्यंत दक्षिणा मिळते. याच काळात तिची कमाई अधिक असते. त्यामुळे महाराष्ट्राच्या काही भागांतील पुरोहित या भागात येण्यास इच्छुक आहेत. मात्र काही पुरोहितांची नवीन पिढी हा व्यवसाय करण्यास तयार नाही. त्यामुळे भविष्यात पुरोहित आयात केली जाण्याची शक्यता आहे, असे विनय कुलकर्णी यांनी सांगितले.