घाऊक आणि किरकोळ बाजारात डाळींचे दर कमी होण्याची चिन्हे नसल्याने चणा डाळ, मूग डाळ, उडीद डाळ यांच्यापासून बनविण्यात येणारे विविध प्रकारचे लाडू आणि चकल्या यांचे प्रमाण यंदा दिवाळीच्या फराळातून कमी झाले असल्याचे आढळून आले. दिवाळीनिमित्त घरोघरी तयार करण्यात येणाऱ्या फराळात यंदा चिवडा, शंकरपाळे आणि करंज्याच जास्त दिसत आहेत. डाळीचे न परवडणारे भाव हे यामागील कारण असल्याचे काही गृहिणींनी सांगितले. तूर डाळीपासून फराळाचा एकही पदार्थ बनविला जात नसल्याने दिलासा आहे, मात्र डाळींचे भाव गगनाला भिडले असल्याच्या भीतीने गृहिणींनी डाळीपासून बनणाऱ्या फराळाला यावर्षी चार हात लांब ठेवणेच पंसत केले आहे. दिवाळी आणि फराळ असे एक समीकरण सर्वज्ञात आहे. अलीकडे तयार फराळावर जोर दिला जात असला तरी फराळातील पाच पदार्थापैकी एखाद्दुसरा तरी पदार्थ घरी बनवला जात आहे. कमी उत्पादन, आयातीला लागलेला विलंब आणि व्यापाऱ्यांची साठेबाजी यामुळे डाळीने किमतीत ऑक्टोबरमध्ये दोनशे रुपयांचा आकडा पार केला होता. साठेबाजांवर कारवाई करून सरकारने विविध प्रकारच्या लाखो टन डाळी जप्त केल्या. त्यात तूर डाळीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे काही प्रमाणात डाळीचे भाव कमी झाले, पण तरीही तूर डाळ १८० रुपयांपेक्षा कमी भावात मिळणे मुश्कील झाले आहे. यंदा डाळीचे देशी उत्पन्नच नसल्याने आयात डाळीवर सर्व व्यापार अवलंबून असल्याचे व्यापारी सांगत आहे. दैनंदिन वापरात महत्त्वाची असलेल्या तूर डाळीची किंमत १८० रुपयांच्या घरात असल्याने मूग डाळ ११० ते ११५ रुपायांना आहे तर उडीद डाळही १५० ते १६० रुपये प्रतिकिलोने विकली जात आहे.
फराळात तूरडाळीचा वापर होत नसला तरी मूग आणि उडीद डाळीच्या मिश्रणापासून उडदाचे लाडू तयार केले जात असतात. त्यांच्या घट्टपणासाठी साखरेऐवजी गूळ वापरला जात असल्याचे पाककलातज्ज्ञ वृषाली साळवी यांनी सांगितले. चकल्यांसाठीही उडदाची व चणा डाळ वापरली जात असल्याचे त्या म्हणाल्या.