18 March 2019

News Flash

डाळी, कडधान्ये आवाक्यात

यंदा डाळी कडधान्यांचे चांगले उत्पादन झाल्यामुळे गृहिणींना दिलासा मिळाला आहे.

यंदा समाधानकारक पाऊस पडल्यामुळे डाळी आणि कडधान्यांचे चांगले उत्पादन हाती आले

समाधानकारक पावसाने उत्पादनात वाढ

यंदा समाधानकारक पाऊस पडल्यामुळे डाळी आणि कडधान्यांचे चांगले उत्पादन हाती आले असून वाशीच्या मुंबई कृषी उत्पन्न धान्य बाजारातील आवक वाढली आहे. तूरडाळ आणि मुगडाळीची आवक वाढली नसली तरीही हरभरा, मसूर, उडीद, चवळीची आवक वाढली आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत बाजारभाव यंदा निम्म्यावर आले आहेत.

कडधान्याच्या पिकास मुबलक पाणी आवश्यक असते. २०१६ मध्ये पाऊस कमी प्रमाणात पडल्याने उत्पादनावर परिणाम झाला होता. कडधान्य, डाळी यांचे दर गगनाला भिडले होते. २०१६-१७मध्ये दिवाळीपर्यंत डाळी व कडधान्यांचे दर चढेच होते. घाऊक बाजारात हरभरा, उडीद, मूग, तूर डाळीने ८० रुपयांचा तर किरकोळ बाजारात १०० रुपयांचा टप्पा पार केला होता. तूर, मसूर, मूग आणि चणाडाळ नित्याच्याच आहारात समाविष्ट असल्यामुळे दर वाढूनही मागणी तेवढीच होती.

यंदा डाळी कडधान्यांचे चांगले उत्पादन झाल्यामुळे गृहिणींना दिलासा मिळाला आहे. बाजारात हरभरा, उडीद, मसूर डाळीची आवक जास्त प्रमाणात होण्यास सुरुवात झाली आहे. आवक वाढून दर आवाक्यात येतील अशी शक्यता व्यापारी वर्तवत आहेत. जाने. २०१७मध्ये हरभऱ्याची २९,६०१ क्विंटल  आवक झाली होती, तर जाने २०१८मध्ये ५५,०४९ क्विंटल आवक झाली. २५ हजार ४८० क्विंटलने वाढ झाली आहे. तसेच बाजारभाव प्रती क्विंटल २४० रुपयांनी घटले आहेत. नोव्हेंबर २०१७पासून कडधान्य आणि डाळींचे दर घटण्यास सुरुवात झाली होती. येत्या काळात कडधान्य, डाळी सामान्यांना परवडणाऱ्या दरांत उपलब्ध होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दिवाळी नंतर कडधान्य, डाळींच्या किमतीत २० रुपयांची घट झाली आहे. यंदा पाऊस समाधानकारक पडल्याने कडधान्य अधिक स्वस्त होण्याची शक्यता आहे, असे व्यापारी हेमंत भानुशाली यांनी सांगितले.

करकोळीत २० रुपयांची घट

गेल्या वर्षी किरकोळ बाजारात डाळी, कडधान्यांच्या दरांनी १०० रुपयांचा टप्पा पार केला होता. नोव्हेंबर २०१७मध्ये किरकोळ बाजारात प्रतिकलो १०० रुपयांवर असलेला हरभरा आता ८० रुपयांवर, चणाडाळ ९० रुपयांवरून ८० रुपयांवर आणि १२० रुपयांवर असलेले बेसन १०० रुपयांवर आले आहे. शेंगदाणेही प्रतिकिलो १२० वरून १०० रुपयांवर आले आहेत.

उडीद डाळीच्या दरात ३० टक्के घसरण

उन्हाळ्यात उडदाचे पापड बनवले जातात. त्यामुळे उडीद डाळीला अधिक मागणी असते. परंतु बाजारभावात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० ते ४० टक्के घट झाली आहे. त्यामुळे दर आवाक्यात आहेत. जानेवारी २०१७ मध्ये ९८० क्विंटल उडीद डाळीची आवक झाली होती. यंदा जाने २०१८मध्ये १६१५ क्विंटल आवक झाली असून ती गतवर्षीपेक्षा ६३५ क्विंटलने अधिक आहे.

First Published on March 13, 2018 3:28 am

Web Title: pulses sprouts rate under control due increase in production