शीव-पनवेल मार्गावरील समस्या सोडवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचा निर्णय

नवी मुंबई शीव-पनवेल महामार्गाच्या ज्या भागांत दरवर्षी मोठय़ा प्रमाणात खड्डे पडून वाहतूककोंडी व अपघात होतात त्या भागांचे काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. हे काम गणेशोत्सवानंतर सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी ७७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

शीव-पनवेल महामार्गाची अवस्था दयनीय झाली असून ठिकठिकाणी पडलेल्या खड्डय़ांमुळे वाहतूककोंडी होऊन सुमारे पाच किलोमीटपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागावर सर्व स्तरांतून टीकेची झोड उठली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत ठोस पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. वाशी टोल नाका ते कळंबोली दरम्यान ज्या-ज्या ठिकाणी रस्त्याची सर्वाधिक दुरवस्था झाली आहे, ती ठिकाणे शोधून काढण्यात आली आहेत. त्या सर्व भागांत गणेशोत्सवानंतर काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. हे काम मार्चअखेपर्यंत संपेल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.

शीव-पनवेल महामार्गावर तीन प्राधिकरणांच्या जागा आहेत. यात सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए आणि नवी मुंबई महापालिकेचा समावेश आहे. हा महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो तर सर्व उड्डाणपुलांलगतचे रस्ते मनापाच्या अखत्यारीत येतात. सीबीडी येथील उड्डाणपूलच्या दोन्ही बाजूचा रस्ता याला अपवाद आहे. तो एमएमआरडीएच्या अखत्यारीत येतो. तर तुर्भे उड्डाणपुलाखालील रस्ता पालिकेच्या अखत्यारीत येतो. महामार्गावर सर्वाधिक आणि गंभीर  समस्या या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर येत आहेत. अशाच प्रकारे खारघर येथील उड्डाणपुलाखालील जागा एमएमआरडीएची असून तेथेही प्रचंड खड्डे पडले आहेत. त्याचे खापर मात्र सार्वजनिक बांधकाम विभागावर फोडले जात आहे.

सार्वजनिक बंधाकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आहेत ते खड्डे तात्पुरते बुजविण्यात येतील. गणपतीनंतर काही भागांत काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे, अशी माहिती नवी मुंबई भाजप अध्यक्ष रामचंद्र घरत यांनी दिली.

खड्डय़ांची ठिकाणे

’ वाशी गाव (मुंबई-पुणे दोन्ही दिशेने)

’ तुर्भे पूल उतरल्यानंतर (दोन्ही दिशेने)

’ नेरुळ पूल उतरल्यानंतर

’ सीबीडी पूल (दोन्ही दिशेने)

’ खारघर पुढील कोपरा पूल उतरल्यानंतर (दोन्ही दिशेने)

पावसाचा जोर ओसरल्यानंतर कोपरा येथून काम सुरू करणार आहोत. नेरूळ, सानपाडा आणि वाशीतील काही भाग, सीबीडी येथे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. साडेचार किमी रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येईल.

– के. टी. पाटील, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग